अहमदनगर - शेतीमालाला विशेषता द्राक्ष आणि कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने आज द्राक्ष फेकुन देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. शेतकऱ्यांच्या सर्वच शेतीमालाला हमी भाव मिळावा या मागण्यासह इतर मागण्या घेऊन पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी कालपासून धरणे आंदोलन सुरू केले ( Puntamba Farmers Agitation ) आहे. आजचा (गुरुवार) या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे.
शेतकऱ्यांनी शेतमाल वाटला फुकट - पुणतांबा येथील शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या धरणे आंदोलनाला आज राज्यातील कांदा, द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी पुणतांब्यात येऊन धरणे आंदोलनाला पाठींबा दिला आहे. शेतीमालाला भाव मिळत नसल्याने तो फेकुन देण्याची वेळ केवळ सरकारच्या शेतकर्यांची बद्दल असलेल्या उदासीन धोरणामुळेच आली आहे. याचा निषेध म्हणून पुणतांबा परीसरातील द्राक्ष, कांदा आणि टरबूज उत्पादक शेतकऱ्यांनी आपला शेतमाल फुकट वाटलाय. पुणतांब्यातील शेतकरी धरणे आंदोलनाचा दुसरा दिवस असुनही या आंदोलकांशी सरकारकडून अद्याप संपर्क साधला गेलेला नाही. उलट पोलीसांनी 149 ची नोटीस आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. नोटीस मिळुनही शेतकऱ्यांनी आंदोलन पुढे सुरुच ठेवण्याचा निर्धार केलाय.
डोळ्यासमोर झाडावरच माल सडतांना पहाण्याची वेळ - राज्यातील शेतकऱ्यांना यंदा कांदा आणि द्राक्षाचा चांगले पिक घेत कोविडच्या दोन वर्षाच्या संकटानंतर यंदाच्या वर्षी चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र केंद्राने गहु, कांदा निर्यात बंदी केली, तर दुसरीकडे द्राक्षाचेही भाव गडगडल्याने आज कांदा शेतकरी साठवुन ठेवु शकत असले. तरी द्राक्ष, टरबूज असे फळ पिके मात्र डोळ्यासमोर झाडावरच सडतांना पहाण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. सरकारकडून कोणतीच दखल घेतली जात नसल्याने शेतकऱ्यांनी फुकट शेत माल वाटल्याच म्हटलय.