अहमदनगर - दिल्ली भाजपचे अध्यक्ष आदेश गुप्ता यांनी आपल्याला ऑफर दिली असल्याचा खळबळजनक दावा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केला आहे. 'दिल्लीत येऊन आम आदमी पक्षाविरोधात एका मोठ्या आंदोलनाची सुरुवात करायची असल्याचे गुप्ता यांनी सांगितले असल्याचे हजारे यांनी म्हटले आहे. अण्णा यांनी गुप्ता यांना एक पत्र लिहून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. माझ्या येण्याने कुठलाही फरक पडणार नाही, असे अण्णा यांनी पत्रात म्हटले आहे.
गुप्ता यांच्या दिल्लीत येण्याच्या निमंत्रणामुळे अतीव दु:ख झाले. २०११च्या लोकपाल आंदोलनासारखे मोठे आंदोलन आपविरोधात उभे करण्याचे त्यांनी सांगितले असल्याचा खळबळजनक दावा अण्णा यांनी केला आहे. ' गेल्या ६ वर्षांपासून भाजपाची सत्ता आहे. तुम्ही देशभरातील तरुणांचे प्रतिनिधीत्व करता. सर्वात मोठा पक्ष सदस्य असल्याचा दावा करणाऱ्या पक्षाने माझ्यासारख्या वयोवृद्ध, छोट्याशा घरात राहणाऱ्या माणसाला बोलावणं दुर्दैवी नाही का, असा सवाल अण्णांनी गुप्ता यांना विचारला आहे.
'केंद्रातील भाजप सरकार दिल्लीत सर्व गोष्टींवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. सीबीआय, ईडी, दिल्ली पोलीसांप्रमाणे सर्व गोष्टींवर केंद्र सरकार नियंत्रण आणू पाहत आहे. पंतप्रधान मोदी नेहमी भ्रष्टाचार संपवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत असतात', असेही अण्णांनी पत्रात म्हटले आहे. मग असे असताना दिल्ली सरकारच्या भ्रष्टाचाराविरोधात तुमचे केंद्र सरकार का पावले उचलत नाही. का तुम्ही केवळ मोठे दावे करता, अशा शब्दांत अण्णांनी खडसावले आहे.