अहमदनगर - शहरातील 12 खासगी कोविड रूग्णालयांतील ऑक्सिजनचा साठा संपत आला आहे. नवीन ऑक्सिजनचा पुरवठा होईल की नाही याबाबत जिल्हा प्रशासनाकडून कोणतीही खात्री मिळालेली नाही. त्यामुळे अनेक रुग्णांवर मृत्यूचे संकट ओढवू शकते. यामुळे नगर शहरातील विविध स्वयंसेवी संस्थांच्या महासंघाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन सुरू केले.
पालकमंत्री आणि जिल्ह्यातील मंत्र्यांचे दुर्लक्ष -
आंदोलकांनी जिल्हा प्रशासनावर विविध आरोप केले. जिल्हा प्रशासन कोरोनारुग्णांबाबत वैद्यकीय सुविधा देण्यात पूर्ण अपयशी ठरले आहेत. रूग्णांना गेल्या तीन ते चार दिवसांपासून रेमडिसीवर इंजेक्शन उपलब्ध होत नाही. त्याचबरोबर ऑक्सिजनचा पुरवठा देखील अनियमित असून तो मागणी पेक्षा खूप कमी प्रमाणात आहे. जिल्हाधिकारी त्याचबरोबर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जिल्ह्यातील तीन मंत्री या सर्वांचे या भयावह परिस्थितीकडे लक्ष नाही. त्यामुळे स्वयंसेवी महासंघाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले.
खासगी रुग्णालयांनी आपल्या स्तरावर सोय करावी -
सध्या शासकीय रूग्णालयात उपलब्ध असलेला काही ऑक्सिजन खासगी रुग्णालयांना दिला जाणार आहे. मात्र, खाजगी रुग्णालयांनी देखील आपल्या रुग्णांसाठी ऑक्सिजन प्लांट किंवा इतर ठिकाणाहून ऑक्सिजन नोंदवून पैसे भरून तो उपलब्ध करून घ्यावा. सध्या ऑक्सिजनची कमतरता असल्याने खासगी रूग्णालयांनी देखील प्रशासनाला सहकार्य करावे, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले.