अहमदनगर - बहुचर्चित अशा नगर दक्षिण लोकसभेची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेसने अखेर जाहीर केली आहे. येथून आमदार संग्राम जगताप यांना उमेदवारी दिली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उमेदवारीची घोषणा केली. त्यामुळे नगर दक्षिणमध्ये सुजय विखे विरुद्ध संग्राम जगताप असा सामना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जगतापांना उमेदवारी हा राष्ट्रवादीचा मास्टरस्ट्रोक असल्याचे बोलले जात आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून नगर दक्षिण लोकसभेच्या जागेसंदर्भात तर्त वितर्क काढले जात होते. आज अखेर राष्ट्रवादी काँग्रेसने येथून आमदार संग्राम जगतापांना उमेदवारी जाहीर केली आहे. राष्ट्रवादीने आतापर्यंत १८ उमेदवार जाहीर केले आहेत. माढ्यासह इतर जागेवरचेही उमेदवार येत्या दोन दिवसात निश्चित होणार असल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली.
कोण आहेत संग्राम जगताप
संग्राम जगताप हे राष्ट्रवादीचे नगर शहरमधून सध्याचे आमदार आहेत.
राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार अरुण जगताप यांचे संग्राम जगताप हे पुत्र आहेत.
नगरमधील किंगमेकर राजकारणी म्हणून ओळख असलेले भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांचे संग्राम जगताप हे जावई आहेत.
संग्राम जगताप यांना उमेदवारी दिल्यामुळे नगरमध्ये सुजय विखे विरुद्ध संग्राम जगताप अशा दोन तरुणांचा सामना होईल. अशावेळी शिवाजी कर्डिले हे लेकीच्या नवऱ्याला मदत करणार की काँग्रेसमधून नुकतेच भाजपमध्ये आलेल्या सुजय विखेंना मदत करणार हा प्रश्न आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे माजी खासदार यशवंत गडाख यांचे सुपुत्र प्रशांत गडाख यांचे आणि विखे घराण्याचे वैर आहे. त्यामुळे त्यांचीही ताकद संग्राम जगतापांच्या मागे उभी राहण्याची शक्यता आहे.
संग्राम जगताप तरुण आणि अत्यंत मनमिळावू आमदार असल्याने त्यांचा जनसंपर्कही दांडगा आहे. त्यामुळे या मतदारसंघातून त्यांचा विजय निश्चित असल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. संग्राम जगताप यांच्यावर शिवसेनेच्या कार्यकर्त्याला मारहाण करण्यापासून इतर काही गुन्हे असल्याचे सांगण्यात येते. तर सुजय विखे-पाटील यांच्यापेक्षा चांगला जनसंपर्क या मतदारसंघात असल्याने राष्ट्रवादीने त्यांना उमेदवारी दिली असल्याचे सांगण्यात येते.