अहमदनगर - सायकलिंग स्पर्धेत आपले नैपुण्य दाखविणाऱ्या संगमनेरच्या प्रणिता प्रफुल्ल सोमण हिने देशपातळीवर बेस्ट प्लेयरचा बहुमान पटकावला आहे. प्रणिता हिने कर्नाटक येथे संपन्न झालेल्या स्पर्धेत ३ सुवर्ण पदकं जिंकली होती. त्यामुळे तिचा गौरव करण्यात आला.
कर्नाटक येथील गदग येथे संपन्न झालेल्या स्पर्धेत संगमनेर येथील प्रणिता सोमण हिने सायकलिंगच्या तीन प्रकाराच्या स्पर्धेत सहभाग घेतला नोंदवला होता. इलाईट टाइम ट्रायल ५१ मिनिट आणि १७ सेकंद, इलाईट मास स्टार्ट १ तास आठ मिनिट आणि टिम रिले या विभागात तिने अतिशय कमी वेळात अंतर पार केलं. हे यश संपादन करून तिने भारतातील बेस्ट प्लेयरचा बहुमान मिळविला.
सायकलिंग फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी मनींदरपाल सिंग यांच्या हस्ते प्रणिताचा गौरव करण्यात आला. प्रणिता हिने अनेक स्पर्धेत सहभाग घेऊन यश संपादन केले. प्रताप जाधव, संजय साठे आणि संजय धोपावरकर यांचे मार्गदर्शन प्रणिताला मिळते. प्रणिताने यापुर्वीही राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभाग घेवून यश संपादन केले आहे. ५ ते ७ मार्च दरम्यान मुंबईत होणा-या राष्ट्रीय रोड स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी तिला मिळाली आहे.