शिर्डी(अहमदनगर) - मुंबई आणि नागपूर (Mumbai to Nagpur) या दोन शहरांना जोडणारा राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेला 700 किलोमीटरचा 'समृद्धी महामार्ग' (Maharashtra Samruddhi Mahamarg) हा महत्त्वाचा महामार्ग आहे. या प्रकल्पातील शिर्डी-नागपूर (Shirdi to Nagpur) हा महामार्ग पुढील दोन महिन्यांत सुरू होण्याची शक्यता आहे. या महामार्गावर कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथे इंटरचेंजचे काम सध्या सुरू आहे. याचबरोबरीने गोदावरी नदीवरील पूल आणि मनमाड - दौंड रेल्वे मार्गावरील पुलही होणे बाकी आहे. सध्या काम धीम्या गतीने सुरू असल्याने येत्या दोन महिन्यात नागपूर-मुंबई टप्पा पूर्ण होऊन वाहतूक सुरू होते की सरकारची घोषणा तारीख पे तारीखच ठरते हे पाहणे मह्त्वाचे असणार आहे.
- महामार्गाचे काम संथगतीने सुरू -
कोपरगाव तालुक्यात गायत्री कन्स्ट्रक्शन कंपनीमार्फत किलोमीटर 502 चे 532 अशा तीस किलोमीटरचे काम सध्या सुरू आहे. नाशिक साईडचे कामही बहुतांशी पूर्ण झाले असले तरी कोकमठाण येथून समृद्धी महामार्गावर नागपुरकडे जाण्यासाठीचा आणि शिर्डीला येण्यासाठीच्या उतरण्याच्या इंटरचेंजचे काम सध्या सुरू आहे.
- रेल्वे मंत्रालयाची परवानगी बाकी -
नगर - मनमाड या रेल्वे मार्गावरून हा समृद्धी महामार्ग जात असल्याने त्यावरील पूल, इंटरचेंज तसेच रस्ते, टोल नाका यांचे काम निम्मे झाले आहे. पुढे वैजापूरपर्यंतही अनेक ओढे, अंडरपासच्या पुलाचे कामे हळू सुरू आहे. या महामार्गावरील महत्वाच्या गोदावरी नदीला पार करणाऱ्या पुलाचे काम सध्या नदीला पाणी सुरू असल्याने संथगतीने सुरू आहे. यापुढे जाऊन नगर- दौंड या रेल्वे मार्गाला क्रॉस करणाऱया पुलाच्या कामाचे क्लेअरन्स अद्याप रेल्वे मंत्रालयाकडून मिळालेले नाही. गोदावरी नदीवरील पूल आणि रेल्वेवरील पूल पूर्ण झाल्याशिवाय थेट शिर्डीपर्यंत पोहचणे शक्य नाही.