अहमदनगर - छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा उजाळा म्हणून रायगडावरील 32 मण सोन्याचे सिंहासन लवकर व्हावे, असे साकडे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांनी शनिशिंगणापूर येथे शनिदेवाला घातले आहे. भिडे गुरुजी यांनी शनिशिंगणापूर येथे भेट देत शनी मूर्तीचे दर्शन घेतले. यावेळी शनिशिंगणापूर देवस्थान समितीचे विश्वस्त अध्यक्ष भागवत बानकर यांनी त्यांचं स्वागत केलं.
देवस्थानचे उपाध्यक्ष विकास बानकर, विश्वस्त बाळासाहेब बोरुडे यावेळी उपस्थित होते. उपस्थित प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांचा यावेळी जोरदार जयघोष केला. यावेळी बोलताना भिडे म्हणाले की, 'महाराष्ट्रातील 38 जिल्हे आणि 394 तालुक्यात छत्रपतींचे कार्य व शिवप्रतिष्ठानचा संकल्प पोहोचवायचा आहे.'
नेवासा तालुका ही संतांची भूमी असून येथून प्रतिष्ठानला मोठी अपेक्षा असल्याची भावना देखील भिडे यांनी व्यक्त केली. भिडे शनिशिंगणापूरमध्ये आल्याने नेवासा पोलिसांच्या वतीने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
हेही वाचा - एक दिवसाच्या अर्भकाला काटेरी झुडपात फेकले, गुन्हा दाखल
हेही वाचा - वाहनांचे सुटे भाग घेऊन जाणारा ट्रक संगमनेरमधील माहुली घाटात पलटी