अहमदनगर - साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांच्या वतीने, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 14 ऑगस्टला 20 जणांचे वैद्यकीय पथक औषधांसह रवाना करण्यात आले. संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी याबाबतची माहिती दिली.
पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यात महापुराच्या थैमानामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. यामुळे हजारो नागरिक बेघर झाले असून अनेक गावेही पुरामुळे बाधीत झाली आहेत. तसेच या पुरात अनेक जनावरे मृत झाली आहेत. अनेक ठिकाणी दूषित पाणी आणि गाळ साचल्यामुळे मोठ्या प्रमाणात रोगराईचे संभाव्य संकट निर्माण झाले आहे. ही परिस्थिती आटोक्यात आणण्याकरीता राज्य शासनाकडून आणि अशासकीय सामाजिक संस्थांकडून तत्काळ वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यात येत आहे. ़
याच पार्श्वभूमीवर साईबाबा संस्थानच्यावतीने देखील पूरग्रस्थांच्या वैद्यकीय मदतीसाठी 20 जणांचे एक फिरते वैद्यकीय पथक, अॅम्ब्युलन्स आणि एक बस शिर्डीहुन पाठविण्यात आली आहे. यासोबतच सुमारे 10 लाख रुपयांची आवश्यक औषधे देखील पाठविण्यात आली आहेत.
संस्थानचे अध्यक्ष डॉ.सुरेश हावरे व विश्वस्त मंडळाने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी १० कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयाला उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. यासोबतच जिल्हाधिकारी कोल्हापूर व सांगली यांना पूरग्रस्तांच्या प्रकृतीला होणारा संभाव्य अपाय टाळण्यासाठी, पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये निर्जंतुकीकरण करणे आणि शुध्दीकरण करणे गरजेचे आहे. यासाठी रासायनीक द्रव्ये इत्यादीचा वापर करणे, फवारणी करणे इत्यादी कामांसाठी प्रत्येकी 1 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी थेट देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले असल्याचे माहिती मुगळीकर यांनी दिली आहे.