शिर्डी (अहमदनगर) Sai Sansthan CEO P Shiva Shankar : साईबाबा संस्थान (Saibaba Temple) हे जागतिक दर्जाचे तीर्थक्षेत्र असल्याने देश विदेशातील लाखो साई भक्त या ठिकाणी येत असतात. साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवा शंकर यांना संस्थानमधून कार्यमुक्त करण्यात आले आहे. अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी मंगळवारी सायंकाळी यासंदर्भातील आदेश काढले. विधी आणि न्याय विभागाच्या प्रधान सचिवांच्या सल्ल्यानुसार अन्य अधिकाऱ्यांकडे कार्यभार सोपवून कार्यमुक्त व्हावे. तसंच पुढील आदेशाची प्रतीक्षा करावी, असं आदेशात म्हटलंय. शासनाच्या या निर्णयाने शिर्डी ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
आयएएस अधिकारी आणि ग्रामस्थ यांच्यात वाद : शिवाशंकर हे ४ मे २०२३ रोजी संस्थानचे सीईओ म्हणून रुजू झाले होते. शिवाशंकर यांनी काही शिस्त लावणारे निर्णयही घेतले होते. मात्र आयएएस अधिकारी आणि ग्रामस्थ यांच्यात नेहमीच वाद होत होते. मंदिर परिसरातील चप्पल बंदी, देशभरात साई मंदिर उभारणीसाठी निधी देण्याच्या घोषणेला ग्रामस्थांनी आक्षेप घेतला होता.
पी. शिवा शंकर यांच्या बदलीची केली मागणी : या पार्श्वभूमीवर शिर्डीकरांनी साई संस्थानला आयएएस अधिकाऱ्यांची आवश्यकता नाही, त्याऐवजी पूर्वीप्रमाणे उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी नियुक्त करावा, अशी मागणी केली होती. मात्र, एका याचिकेवर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने संस्थानचा कारभार बघण्यासाठी आयएएस अधिकारी नेमण्याचे निर्देश दिले आहेत. याबाबत राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करून हा आदेश रद्दसाठी प्रयत्न करावेत, अशीही मागणी ग्रामस्थांची आहे. गेल्या आठवड्यात गुरुवारी सर्वपक्षीय शिर्डीकरांच्या शिष्टमंडळाने महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेऊन पी. शिवा शंकर यांच्या बदलीची मागणी केली होती.
हेही वाचा -