अहमदनगर- शिर्डीच्या साईबाबा मंदिराची कवाडे आज नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पहाटे उघडण्यात आली आहेत. आज साईबाबांच्या पहाटेच्या काकड आरतीला शिर्डीकरांसह देशातील विविध भागातून आलेल्या ९० भक्तांना साईमंदीरात प्रवेश देण्यात आला आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून साईमंदिर बंद असल्याने प्रत्यक्ष मंदिरात जाऊन दर्शन घेण्यासाठी आसुसलेल्या भक्तांची इच्छा आज पुर्ण झाली. भक्तांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. ऑनलाईन पास आणि देणगी दिलेल्या भक्तांना गुरुवारी पहिल्यांदा दर्शनाचा मान मिळाला आहे.
हेही वाचा-कोल्हापुरात आदिशक्तीचा आजपासून जागर; श्री अंबाबाईसह ज्योतिबा मंदिर सज्ज
साईमंदिर खुले झाल्याने ग्रामस्थांमध्ये आनंद
शिर्डीतील ग्रामस्थांनी साईभत्तांच्या स्वागतासाठी रांगोळ्या साकारल्या आहेत. साई संस्थानच्यावतीनेही साईमंदीरात आणि परीसरात फुलांची रोषणाई करण्यात आली आहे. मंदीर उघडण्याच्या पुर्वसंध्येला शिर्डीतील साईपालखी मार्ग ग्रिन अँन्ड क्लिन शिर्डीच्या सदस्यांनी झाडून स्वच्छ केली आहे. साईमंदीर सहा महिन्यानंतर खुले झाल्याने शिर्डीच्या अर्थकारणाला बसलेली काजळी दूर होणार असल्याने शिर्डीत दिवाळीपुर्वीच दिवाळी साजरी करण्यात आली आहे. साईमंदिर उघडण्याचा आनंद व्यक्त करत द्वारकामाई परिसरात ग्रामस्थांनी दिपोत्सव साजरा केला आहे.
हेही वाचा-VIDEO : 7 ऑक्टोबर राशीभविष्य - कसा असेल तुमचा दिवस? जाणून घ्या आजचे राशीभविष्य
राज्यात कोरोना आटोक्यात येत असल्यामुळे राज्य सरकारने अनेक नियमांत शिथिलता आणली आहे. दोन दिवसांपूर्वी राज्यातील शाळा सुरू करण्यात आल्या. उद्यापासून राज्यातील मंदिरे खुली होत आहेत. अनेक महिन्यापासून मंदिरेही बंद होती, मात्र अखेर राज्य सरकारने मंदिरे खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर मंदिर प्रवेश सुरू होणार आहे. मात्र अटी-शर्तींसह भाविकांना प्रवेश दिला जात आहे.