शिर्डी (अहमदनगर) : कोरोनाचे नियम शिथिल झाल्यानंतर शिर्डी साईबाबांचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले झालं. त्यानंतर अवघ्या सात महिन्यांत साईंच्या झोळीत तब्बल 188 कोटी 55 लाख रुपयांचे विक्रमी दान जमा झाले. त्याचबरोबर मंदिर खुले झाल्यानंतर पाच महिन्यांतच 41 लाख भाविकांनी शिर्डीला येऊन साईबाबा समाधीचे दर्शन घेतले असल्याची माहिती साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली आहे. भाविकांच्या संख्येत आणि दानात दररोज वाढ होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
अशा पद्धतीने भाविकांनी साईबाबांना दिले दान : वर्षभरात करोडो भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येतात. अशा परिस्थितीत भाविक बाबांच्या दरबारात रुपये-पैसे, सोने-चांदी आणि इतर अनेक मौल्यवान वस्तूंचे दान करतात. कोरोना महामारीनंतर साईमंदिर सुरू झाल्यापासून गेल्या सात महिन्यांत साई भक्तांनी बाबांची झोळी भरगच्च भरून टाकली आहे. ऑक्टोबर 2021 ते मे 2022 या सात महिन्यांत एकूण 188 कोटी 55 लाख रुपये साईंच्या तिजोरीत जमा झाले आहेत. साई मंदिर उघडल्यानंतर पाच महिन्यांत 41 लाख भाविकांनी साई समाधीचे दर्शन घेतले असल्याची माहिती यावेळी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली आहे.
निर्बंध शिथिल झाले आणि साई मंदिराने पुन्हा एकदा भरारी घेतली : कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालखंडात शिर्डीची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झाली होती. पहिल्या लॉकडाऊनमध्ये 17 मार्च 2020 मध्ये साई मंदिरचे कवाड भाविकांसाठी बंद झाले ते तब्बल आठ महिने म्हणजे 16 नोव्हेंबर 2020 रोजी उघडले. पुन्हा कोविड निर्बंध सुरू झाल्याने 5 एप्रिल 2021 रोजी साई मंदिर पुन्हा बंद झाले. त्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या परवानगीने 7 ओक्टोबर 2021 रोजी भाविकांसाठी खुले करण्यात आले. यावेळी निर्बंध कडक होते. मात्र, शिर्डीला साई दर्शनासाठी भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होत होती. निर्बंध शिथिल झाले आणि साई मंदिराने पुन्हा एकदा भरारी घेतली. जसे भाविक वाढले तसे येथील दानाचा आकडाही वाढू लागला आहे. दिवसाकाठी हजारात येणारे दान आता कोटींमध्ये येत आहे.
फकिराचे झाले कुबेर : शिर्डीच्या साईबाबांनी आपले संपूर्ण जीवन फकीर अवस्थेत व्यतीत केले. भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह केला. पण त्यांच्या भक्तांनी त्यांना कुबेर स्वरूप बनवले आहे. साईबाबा मंदिरात दररोज हजारो भाविक येतात. सलग सुटीच्या दिवसात दोन ते तीन लाख भक्त साईबाबा समाधीचे दर्शन घेतात. कोरोना संकट काळात दोन वर्षे मंदिर भाविकांसाठी बंद राहिले होते. मात्र, त्यानंतर मंदिर खुले झाल्यापासून भाविकांचा शिर्डीला येण्याचा ओघ पूर्ववत होताना दिसत आहे.
करोडो भाविकांचे श्रद्धास्थान : शिर्डीच्या साईबाबावंर भाविकांची अपार श्रद्धा आहे. साईबाबा सर्वधर्म समभावाचे श्रद्धस्थान असल्याने सर्व जातीधर्माचे लोक या ठिकाणी नतमस्तक होतात. "साईबाबा नवसाला पावतात, मनातील सर्व इच्छा पूर्ण करतात, बाबांना एका हाताने दान केले तर बाबा दहा हाताने भरभरून देतात", अशी भाविकांची धारणा आहे. त्यामुळे येथे येणारा भाविक साईंच्या दानपात्रात आपल्या इच्छाशक्तीनुसार दान टाकतो. त्यामुळे तीन दिवसांत एकदा साई मंदिरातील सर्व दानापात्रातील रकमेची मोजदाद होते. सरासरी एक दिवसाला एक कोटीचे दान येथे येते.
हेही वाचा : Sai Sansthan Donation : कोरोनानंतर केवळ दोन महिन्यात साई संस्थानला 61 कोटींचे दान