अहमदनगर - जिल्ह्यातील कर्जत,पारनेर, अकोले आणि शिर्डी नगर पंचायतीच्या निवडणुका ( Ahmednagar Local Body Elections 2021 ) आहेत. मात्र शिर्डीत नगरपालिकेचा ( Shirdi Nagar Panchayat Election 2021 ) आग्रह सर्वपक्षीय झाला. त्यामुळे इथे कोणत्याही पक्षाने उमेदवारी अर्ज दाखल केले नाही. त्यामुळे अहमदनगर उत्तरेत अकोले तर दक्षिणेत कर्जत आणि पारनेर इथे रविवारी प्रचाराची सांगता होत आज मंगळवारी मतदानास सुरुवात झाली. निवडणुकीच्या निमित्ताने चांगलाच प्रचार रंगतदार झाला.
रोहित पवार, राम शिंदे, निलेश लंके, विजय औटींची प्रतिष्ठा पणाला.. मतदानाला संमिश्र प्रतिसाद कर्जत मध्ये रोहित पवारांचे मतदाना कडे लक्षमाजी मंत्री राम शिंदे ( Ex Minister Ram Shinde ) आणि विद्यमान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार ( MLA Rohit Pawar ) यांच्यातील राजकीय संघर्षातुन कर्जत नगरपंचायत निवडणूक ( Karjat Nagar Panchayat Election 2021 ) राज्यात लक्षवेधी झाली आहे. भाजपच्या राम शिंदेंनी आ. रोहित पवार यांच्यावर दहशत आणि उमेदवारांवर आमिषे दाखवल्याचा आरोप करत दोन दिवस आंदोलन केले. भाजपच्या एका उमेदवाराने आपला अर्ज मागे घेत राष्ट्रवादी उमेदवाराच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा केला. तसेच अजून एका वार्डात भाजप उमेदवाराने राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा दिलाय यामुळे राम शिंदे चांगलेच संतापले आहेत. तर या आरोपांचे खंडन आ. रोहित पवार यांनी केले आहे. आज मतदान सुरू होताच आ. रोहित पवार विविध मतदान केंद्रांवर फिरत होते.
पारनेर मधेही शांततेत मतदानकर्जत, पारनेर याठिकाणी मतदानास सुरुवात होताच मतदार आल्याचे दिसून आले. मात्र मतदान केंद्रावर मोठी गर्दी दिसून आली नाही. एकूण दोन्ही ठिकाणी सकाळच्या सत्रात मतदानात संमिश्र प्रतिसाद दिसून येत होता. थंडी वाढल्याने मतदार ऊन पडल्यावर मतदानास बाहेर पडतील असा अंदाज आहे. मात्र एकूण मतदान प्रक्रिया ही शांततेत सुरळीत सुरू असल्याचे चित्र सकाळच्या सत्रात दिसून आले.
पोलीस-प्रशासन सतर्ककर्जत आणि पारनेर या दोन्ही ठिकाणी परस्पर राजकीय संघर्ष मोठा आहे. कर्जत मध्ये आ. रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यात तर पारनेर मध्ये आमदार निलेश लंके ( MLA Nilesh Lanke ) आणि शिवसेनेचे माजी मंत्री विजय औटी (Ex Minister Vijay Auti ) यांच्यात विळ्याभोपळ्याचे नाते आहे. निवडणूक प्रचारात याचे चित्र दोन्ही ठिकाणी दिसून आले आहे. ही निवडणूक दोन्ही बाजूंनी मोठी वर्चस्वाची आणि प्रतिष्ठेची करण्यात आल्याने प्रशासनावर निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्याचे आव्हान आहे. या दोन्ही ठिकाणी पोलीस बळ पुरेशा संख्येने तैनात करण्यात आले आहे.
भाजपकडून निवडणूक आयोगाला पत्रकर्जतमध्ये भाजप उमेदवारांवर आमिषे दाखवत तसेच राजकीय दबाव वापरत दहशत केल्याचा आरोप रोहित पवार आणि राष्ट्रवादीवर करत प्रदेश भाजपकडून राज्य निवडणूक आयुक्त ( State Election Commissioner ) यांना लेखी तक्रार करून कर्जत नगर पंचायत निवडणूक रद्द करावी असे पत्र देण्यात आले आहे. उमेदवारी माघारी दिवशी निवडणूक कार्यालयात झालेल्या कार्यकर्त्यांच्या गोंधळाचे व्हिडीओ निवडणूक आयोगाला देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. निवडणूक आयोग यावर काय निर्णय घेणार याबद्दल उत्सुकता आहे.
नगरमध्ये मनपाच्या एका जागेसाठी पोटनिवडणुकनगर पंचायती सोबतच नगर शहरातील महानगरपालिकेच्या ( Ahmednagar Municiple Corporation Reelection 2021 ) प्रभाग 9 क मधील एका जागेसाठी पोटनिवडणुकी साठी आज मतदान पार पडत आहे. भाजपचा तत्कालीन उपमहापौर श्रीपाद छिंदम ( Ex Corporator Shripad Chhindam ) याचे नगरसेकत्व रद्द झाल्याने ही पोटनिवडणुक होत आहे. मुख्य म्हणजे या प्रभागात छिंदमचे मोठे वर्चस्व असले तरी त्याच्या कुटुंबातील कोणीही निवडणुकीत नाही. याठिकाणी भाजप विरुद्ध मविआ आघाडीकडून शिवसेना उमेदवारात मुख्य लढत आहे. या सकाळच्या सत्रात संथ गतीने आणि शांततेत मतदान सुरू आहे.
कर्जतमधे आ.रोहित विरुद्ध राम शिंदे सामना2009 आणि 2014 मधे कर्जत-जामखेड मतदारसंघात राम शिंदे भाजपकडून आमदार झाले. 2019 पूर्वी हा मतदारसंघ अनुसूचित जाती साठी राखीव होता. 2014 ला भाजपकडून निवडून आल्यानंतर राम शिंदे गृहराज्यमंत्री आणि नंतर जलसंधारण मंत्री झाले तसेच त्यांना अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री पदही सरकारने दिले. या काळात जिल्ह्यात आणि राज्यात मोठे वजन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे जवळचे तर तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विश्वासातील अशी ओळख असलेले राम शिंदे यांचे आपल्या कर्जत-जामखेड मतदारसंघात एकहाती वर्चस्व दिसून आले. मात्र 2014 नंतर शरद पवारांचे नातू आणि अजित पवारांचे पुतणे अशी ओळख तसेच बारामती ऍग्रोची ताकत घेऊन रोहित पवार कर्जत-जामखेड मध्ये डेरे दाखल झाले. बघता-बघता रोहित यांनी राम शिंदेंचा गड कधी कमकुवत केला, हे शिंदेंना पण समजले नाही.
शिंदेंसाठी वर्चस्व आणि अस्तित्वाची लढाई2019 ला तत्कालीन जलसंधारण आणि जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले राम शिंदे यांना मोठ्या फरकाने पराभूत करत रोहित पवार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार झाले. त्यानंतर आ.रोहित यांनी कुठेही न थांबता जामखेड आणि कर्जत तालुक्यातील भाजप सतत खिळखिळीत केली. याचा परिपाक सध्या पारपडत असलेल्या कर्जत नगरपंचायत निवडणुकीत दिसून आले. उमेदवारी माघारीच्या दिवशी एका महिला भाजप उमेदवाराने माघार घेत राष्ट्रवादीच्या महिला उमेदवाराचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा केला. तर हार्दिक पटेल यांच्या जाहीर सभेत एका भाजप उमेदवाराने गळ्यात राष्ट्रवादीचा पंचा घालत राष्ट्रवादी उमेदवाराला जाहीर पाठिंबा दिला. एकूण निवडणूक प्रचारात राष्ट्रवादी कडून आ. रोहित पवार यांनी राम शिंदे अर्थात भाजपवर कुरघोडी करत केंद्रस्थानी राहण्याचा प्रयत्न केला. या निवडणूक निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष असून, आ.रोहित यांच्या वर्चस्वाची तर राम शिंदे यांच्या अस्तित्वाची लढाई म्हणून या निवडणूक निकालाकडे पाहिले जात आहे.
पारनेरमधे राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशीच लढतराज्यात सेना-राष्ट्रवादी-काँग्रेसचे आघाडी सरकार असले तरी पारनेरमध्ये मात्र राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशी अटीतटीची लढाई आहे. 2005, 2009 आणि 2014 असे सलग तीनदा शिवसेनेकडून निवडून आलेले विधानसभा उपाध्यक्ष विजय औटी यांना 2019 मात्र नवख्या आणि माजी शिवसैनिक राहिलेल्या निलेश लंके यांनी मोठ्या फरकाने पराभूत करत राज्याचे लक्ष वेधून घेतले. जनसामान्यांत आपला साधा माणूस अशी ओळख निर्माण करत आ.निलेश लंके यांनीही औटी यांना अनेक ठिकाणी नामोहरण करण्याचा प्रयत्न केला. मधल्या काळात तर विजय औटी सक्रिय राजकारणात आहेत की नाही अशी चर्चा सुरू असतानाच पारनेर पंचायत निवडणुकीच्या निमित्ताने विजय औटी पुन्हा आक्रमकपणे उभे राहत आ.निलेश लंके यांच्या विरोधात दंड थोपटले. शिवसेनेचे जिल्ह्यातील असलेले जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख ( Minister Shankarrav Gadakh ) यांनी औटी यांना ताकत दिली. त्यामुळे आता पारनेर पंचायत निवडणूक ( Parner Nagar Panchayat Election 2021 ) या दोन्ही नेत्यांनी मोठी प्रतिष्ठेची केली आहे.