अहमदनगर - जिल्ह्यातील अनेक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्या अर्जासोबत दिलेल्या शपथपत्रात उमेदवारांनी त्यांच्याकडे असलेल्या स्थावर व जंगम संपत्तीची माहिती दिली आहे. उमेदवारांनी दिलेल्या माहितीनुसार मूळचे बारामतीचे असलेले व नगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेले रोहित पवार यांच्याकडे 24 कोटी 33 लाखांची संपत्ती आहे.
हेही वाचा - भाजपचे 'कुबेर'..! मंगलप्रभात लोढांच्या संपत्तीचा आकडा पाहून व्हाल थक्क
रोहित यांच्याकडे 5 कोटी 62 लाखांची स्थावर मालमत्ता आहे. तर, 18 कोटी 50 लाखांची जंगम मालमत्ता आहे. 11 लाख 92 हजारांची एक गाडी रोहीत यांच्या नावे आहे. ते महागड्या घड्याळांचे शौकिन असून, त्यांच्याकडे वेगवेगळ्या कंपन्यांची २८ लाखाची ५ घड्याळे आहेत. त्यांच्यावर 4 कोटी 80 लाखांचे कर्जदेखील आहे.
तर, रोहित यांच्या पत्नी कुंती यांच्याकडे 7 कोटी 28 लाखांची जंगम आणि 1 कोटी 64 लाखांची स्थावर संपत्ती आहे. यावर्षीच्या आयकर विवरणपत्रात रोहित यांनी 3 कोटी 67 लाख54 हजार रुपये इतके उत्पन्न दाखवले होते. तर, कुंती यांनी 26 लाख 23 हजार 606 इतके उत्पन्न दाखवले होते.
हेही वाचा - विधानसभेच्या रिंगणात उतरलेल्या आदित्य ठाकरेंची संपत्ती माहीत आहे का?
दरम्यान, आदित्य ठाकरे आणि रोहित पवार या दोघांनी आजच त्यांचा उमेदवारीचा अर्ज भरला. यावेळी दोघांनीही त्यांच्याकडील स्थावर आणि जंगम मालमत्तेचा तपशील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर केला. आदित्य आणि रोहित यांच्या प्रतिज्ञापत्रांवरील संपत्तीचा तपशील पाहिल्यानंतर रोहित पवार हे आदित्य ठाकरे यांच्यापेक्षा जास्त श्रीमंत असल्याचे समोर आले आहे. आदित्य ठाकरेंच्या नावे 11 कोटी 38 लाखांची संपत्ती आहे. आदित्य ठाकरेंनी ते पेशाने व्यावसायिक असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.