अहमदनगर- 'कोरोना महामारीने आणि नैसर्गिक संकटाने अगोदरच जनतेला खूप मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे गावातील सर्व गट-तट बाजुला ठेऊन निवडणुकीसाठी होणाऱ्या खर्चास फाटा देत गावच्या विकासासाठी व हितासाठी ग्रामस्थांनी एकत्र येऊन काम करायला हवे. आर्थिक खर्च वाचवण्याबरोबरच गावात असलेल्या राजकीय वादांना देखील संपुष्टात आणण्यासाठी नागरिकांनो, आपल्या होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करा, आणि आपल्या गावाच्या विकासासाठी ३० लाखांचा विकासनिधी घ्या', अशी आवाहन राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड तालुक्यातील निवडणूक कार्यक्रम लागलेल्या गावांतील नागरिकांना केले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या अगोदरपासुनच आमदार रोहित पवार यांनी मतदारसंघात कामाचा तडाखा आपल्या'बारामतीपॅटर्न' माध्यमातून सुरु आहे. गाव पातळीवर अधिक योजना व त्यांची माहिती पोहोचवण्यासाठी राष्ट्रवादी विकास समित्या स्थापन करून गावांना सक्षम करण्यासाठी त्यांच्याकडून विविध संकल्पना राबवल्या जात आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघते. गावच्या सलोख्यास बाधा पोहोचते आणि गटा-तटाच्या राजकारणात गावचा विकास खुंटतो. सध्याच्या काळात प्रत्येक व्यवसायाला आणि त्यात काम करणाऱ्या नागरिकांना कोरोनाचा फटका बसला आहे. प्रशासनावरही याचा ताण अधिक वाढला आहे. अनेकांचे रोजगार गेले तर अनेकांना खुप मोठ्या आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे 'बिनविरोध निवडणूक' ही प्रक्रिया गावच्या हिताची ठरणार आहे. यासाठी साहजिकच बिनविरोध निवडणुका पार पाडणाऱ्या गावांसाठी विकासाच्या दृष्टीने हा विचार फायद्याचा ठरणारा आहे. ग्रामपंचायती बिनविरोध होण्यासाठी सर्वच सुजाण नागरिक प्रयत्नशील असतील, असा विश्वास आमदार पवार यांनी व्यक्त केला आहे.
![तहसीलला जत्रेचे स्वरूप-](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-ahm-01-rohit-pawar-bite-7204297_31122020114855_3112f_1609395535_223.jpg)
एकीकडे बिनविरोध निवडणुकांचे आवाहन आणि आर्थिक मदतीचे आवाहन असतानाही अनेक ग्रामपंचिती मध्ये निवडणुकीचे फॉर्म भरण्यासाठी मोठी गर्दी दिसली, अनेक स्थानिक गावपातळीवरचे नेते मंडळी लवाजम्यासह तहसील कार्यालयात दाखल होते, यात महिला-मंडळींची वर्णी पण दिसून येत होती. शेवटच्या दिवशी ग्राम पंचायतीचे अर्ज भरण्यासाठी उमेदवार व नागरिकांची तोबा गर्दी झाली होती. नागरिकांच्या व वाहनाच्या गर्दीमुळे तहसील आवाराभोवती जत्रेचे स्वरूप आले होते. आता निवडणूक अर्ज भरले असले तरी माघार घेत किती ग्रामपंचायती बिनविरोध होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहेत.