अहमदनगर - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोप प्रकरणी सीबीआयने राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यात खऱ्या अर्थाने राजकारणाचा वास आम्हाला येत असल्याचा आरोप महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. त्या घटनेवर चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने चौकशी समिती नेमली होती. त्याची सगळी चौकशीही होणार होती. असे असताना सुद्धा ज्या पद्धतीने घडते आहे, ते अत्यंत दुर्दैवी आहे, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले.
संगमनेर येथील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून सुरू केलेल्या पाचशे बेडचे कोविड- केअर सेंटरला महसूलमंत्री थोरात यांनी भेट दिली. यावेळी पत्रकारांशी बोलताना थोरात म्हणाले की, नागरिकांना मोफत लस द्यावी, असा आग्रह काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचा आहे. हा आग्रह राज्य शासनामध्ये काँग्रेसने धरला आहे. शेवटी त्यांच्यावर चर्चा होवून त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे निर्णय घेतील.
कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून अनेक गरजू व गरीब रुग्णांना बेड न मिळाल्याने मृत्युदर वाढत आहे. कोरोना रुग्णाला लागण झाल्यानंतर तात्काळ उपचार मिळाल्यास तो बरा होण्यास मदत होते व यामुळे संगमनेर शहरात 500 बेड चे भव्य कोव्हिड सेंटर उभारण्यात आले असून महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पुढाकाराने सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याचे वतीने मंगल कार्यालयात हे कोव्हिड सेंटर सज्ज झाले आहे.
एरवी एप्रिल व मी महिन्यात वर वधू आणि वऱ्हाडी मंडळींनी गजबजलेल्या संगमनेर शहरातील विघ्नहर्ता मंगल कार्यालयात आज 200 हुन अधिक कोरोना रुग्ण उपचार घेत असून राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज या कोव्हिड सेंटरला भेट दिली असून पाहणी केली. अनेक रुग्णांना प्राथमिक अवस्थेत उपचार मिळाल्यास त्यांना भविष्यात ऑक्सिजनची गरज भासत नाही आणि या उद्देशाने हे सेंटर सुरू करण्यात आल्याची माहिती थोरात यांनी देताना असे कोव्हिड सेंटर राज्यात सुरू केल्यास रुग्णाला मदत होईल, असे मत थोरातांनी व्यक्त केले आहे.