अहमदनगर - यशस्विनी ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या निर्घृण हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार मास्टर माईंड बाळ बोठे हा घटनेनंतर तीन महिन्यांपासून फरार असल्याने पोलीस प्रशासनाला सापडू शकला नाही. त्याला अद्याप अटक न होण्यामागे राजकीय दबाव आहे, असा आरोप करत जरे यांचा मुलगा रुणाल जरे याने आज (शुक्रवार) पासून जिल्हा अधीक्षक कार्यालयाबाहेर उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनाला सामाजिक कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिलेला आहे.
राजकीय दबाव असल्याने बोठे सापडत नाही -
यावेळी आंदोलनास बसलेले रुणाल जरे यांनी ईटीव्ही भारत सोबत बोलताना सांगितले की, माझ्या आईच्या निर्घृण हत्येमागे पत्रकार बाळ बोठे असल्याचे तपासात पुढे आलेले आहे. पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हाही दाखल केला आहे. मात्र इतर आरोपींची चैन काही तासात पोलिसांनी उघड केली असली तरी हत्येची सुपारी देणारा बाळ बोठेला पोलीस पकडू न शकल्यामागे राजकीय दबाव असल्याचा आरोप केला. रुणाल जरे यांनी स्पष्ट कुणाचे नाव न घेता संपूर्ण जिल्ह्याला माहीत आहे, की कुणाच्या राजकीय दबावाखाली पोलीस आहेत. पोलिसांनी पाच आरोपी पकडून चांगले काम केले असले तरी बोठेला अटक झाली नसल्याने आम्ही समाधानी नाही, अशी भावना जरे यांनी व्यक्त केली.
पोलिसांना बाळ बोठे सापडत नसल्याने रुणाल जरे यांच्या मामाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा अशी मागणी केलेली आहे. याबद्दल रुणाल जरे यांनी सांगितले, की मी अनेक नेत्यांना व अधिकाऱ्यांना भेटून मास्टरमाइंड बोठेच्या अटकेची मागणी केली. मात्र त्याला अटक झाली नाही. मध्यंतरी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मला माध्यमांसमोर आरोपी बोठेला दोन दिवसांत अटक होईल, असे आश्वासन दिले होते. मात्र त्यालाही आता अनेक दिवस उलटले आहेत. आमची एकच मागणी आहे की बाळ बोठेला आता तात्काळ अटक करा, अन्यथा आपण मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या निवास्थानासमोर आंदोलन करू, असा इशाराही रुणाल जरे यांनी दिला आहे.
३० नोव्हेंबरला झाला होता रेखा जरे यांची निर्घृण हत्या -
३० नोव्हेंबर 2020 रोजी रेखा जरे या कुटुंबासोबत पुण्याहून नगरकडे आपल्या कारमधून परतत असताना वाटेत जातेगाव घाटात त्यांच्या कारला मोटारसायकल वरून आलेल्या दोन युवकांनी अडवले आणि तुमच्या कारच्या आरशाचा कट मारल्याचा कांगावा करत सुरुवातीला हुज्जत घातली. त्याच दरम्यान आरोपींनी रेखा जरे यांच्या गळ्यावर धारदार चाकूने वार केला. यात रेखा जरे यांचा अतिरक्तस्राव झाल्याने मृत्यू झाला. भांडणाच्या दरम्यान जरे यांचा मुलगा रुणाल जरे याने एका आरोपीचा फोटो आपल्या मोबाईलमध्ये काढला होता. हाच फोटो पोलिसांना आरोपींपर्यंत घेऊन गेला आणि सुरुवातीला दोन हल्लेखोर, तर या कटात सहभागी असलेले इतर तीन आरोपी अशा पाच आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले. या पाच आरोपींची चौकशी दरम्यान रेखा जरे हत्याकांडाचा मुख्यसूत्रधार वरिष्ठ पत्रकार बाळ उर्फ बाळासाहेब जगन्नाथ बोठे असल्याचे उघड झाले. मात्र पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचेपर्यंत तो फरार झाला होता. तेव्हापासून तो अद्याप फरार असून आता न्यायालयाने बाळ बोठेला अधिकृतपणे फरार घोषित केले आहे.