अहमदनगर - जिल्ह्यात पोलीस कर्मचाऱ्यांच्या कोरोना विषाणूपासून बचावासाठी किट देण्याबरोबरच त्यांना खाण्याचे पौष्टिक पदार्थही देण्यात येत आहेत. या किटमधील काही वस्तू नियमित तर काही वस्तू दर दोन दिवसांनी नियमितपणे देण्यात येत आहेत. शहरी भागात नागरिकांना वारंवार आवाहन करूनही नागरिक अत्यावश्यक गोष्टींच्या बहाण्याने मोठ्या संख्येने बाहेर पडताना दिसत आहेत. त्यामुळे या नागरिकांना घरी परतवून लावण्याचे आव्हान पोलीस कर्मचाऱ्यांना रोज निभवावे लागते.
रस्त्यावर अनावश्यक गर्दीला तोंड देताना या पोलीस कर्मचाऱ्यांना पण कोरोना विषाणूची लागण होऊ शकते. त्यामुळे पोलीस विभागाने यादृष्टीने पावले उचलली असून प्रत्येक पोलीस कर्मचारी-अधिकाऱ्याला सेफ्टी किट नियमित देण्यात येत असून यात मास्क, हॅन्ड ग्लोज, फेस शिल्डर, गॉगल, स्कार्फ, सॅनिटायझर, लाठी या वस्तू तर पौष्टिक आहारात चवनप्राश, चिक्की, राजगिरा लाडू या वस्तू दिल्या जातात.
जिल्हा पोलीस प्रमुख अखिलेशकुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याच्या सर्व उपअधीक्षकांमार्फत सर्व पोलीस ठाण्यात या किटचे नियमित वाटप करण्यात येत आहे. शहर विभागाचे उपाधीक्षक संदीप मिटके यांच्या देखरेखीखाली आज शुक्रवारी पोलीस अधीक्षक कार्यालयात या किट आणि पौष्टिक आहाराचे वितरण कर्मचाऱ्यांना करण्यात आले.