शिर्डी - साईबाबा लहान मुलांसोबत द्वारकामाई आणि चावडी परिसरात रंगपंचमी खेळत होते, असे मानले जाते. ही परंपरा ग्रामस्थांनी आजही कायम ठेवली आहे. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साध्या पद्धतीने हा उत्सव साजरा करण्यात आला. होळीनंतर पाच दिवसांनी रंगपंचमी साजरी करण्याची शिर्डीमध्ये प्रथा आहे. शुक्रवारी रंगपंचमी साजरी करण्यात आली.
आज रंगपंचमीनिमित्त साईबाबांच्या मुर्तीला पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करण्यात आले होते. त्यानंतर साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांचा हस्ते वस्त्रावर रंग टाकण्यात आला, व त्यानंतर बाबांची आरती करण्यात आली. दरम्यान आज एकनाथ षष्ठीही असल्याने, साई समाधीजवळ संत एकनाथ महारांजांची प्रतिमा देखील ठेवण्यात आली होती.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रथयात्रा रद्द
शिर्डीत साजऱ्या होणाऱ्या रंगपंचमीचे खास वैशिष्ठ म्हणजे, यादिवशी शिर्डीमध्ये साईबाबांची भव्य रथयात्रा निघते, या रथयात्रेत हजारो भाविक सहभागी होत असतात. रथयात्रेत सहभागी झालेल्या भाविकांकडून रंगाची उधळ करण्यात येते. हे दृष्य डोळ्याचे पारणे फेडणारे असते. मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अतिशय साधेपणाने हा उत्सव साजरा करण्यात आला आहे.
हेही वाचा - भाजप नावाचे संकट दूर करायचे असेल तर ममता बॅनर्जींच्या पत्राचा विचार करावा -संजय राऊत