अहमदनगर - जिल्ह्यातील अकोले येथून राजूर मार्गे भंडारदऱ्याकडे स्वस्त धान्य घेऊन जाणारे चार ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. ट्रक चालकांकडे असणारी धान्य वाहतुकीबाबतची कागदपत्रे संशयास्पद असल्याचे समजते आहे. त्यामुळे पोलिसांनी हे ट्रक पोलीस ठाण्यात आणून चौकशी सुरू केली आहे. दरम्यान माजी आमदार वैभवराव पिचड यांनी पोलीस ठाण्याला भेट देऊन या घटनेबद्दल चिंता व्यक्त करत दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली.
अकोले तालुक्यातील राजूर येथे पोलिसांनी स्वस्त धान्य घेऊन जाणाऱ्या चारे ट्रक पकडले आहेत. ट्रक चालकांच्या संशयास्पद हालचाली व कागदपत्रांवर गोडाऊन किपरच्या सह्या नाहीत, या ट्रकचे क्रमांक एम एच 17 ऐवजी मुंबई पासिंग आहेत. राजूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, सहायक फौजदार नितीन खैरनार, हेड कॉन्स्टेबल देविदास भडकवार यांनी हे चारही ट्रक ताब्यात घेऊन तहसीलदार मुकेश कांबळे यांच्याशी संपर्क साधून घटनेचा तपशील दिला आहे. कोरोनामुळे आदिवासी भागातील जनतेला धान्य मिळत नसताना या धान्याचा परस्पर विक्रीचा संशय आल्याने राजूर पोलिसांनी हे ट्रक ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.
याबाबत तहसीलदार कांबळे यांनाही पत्र देऊन मालाची तपासणी करून पुढील कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. तालुक्यात स्वस्त धान्य पुरवठा करणाऱ्या वाहनांवर हिरवा पट्टा असावा, वितरण व्यवस्था असा बोर्ड असावा असे असतानाही हे नियम न पाळता मुंबई पासिंगच्या ट्रक का निवडल्या? संबंधित अधिकृत पुरवठा धारक कोण? याची चौकशी व्हावी अशी मागणी आदिवासी विकास परिषदेचे जिल्हा अध्यक्ष विजय भांगरे यांनी केली आहे. माजी आमदार वैभवराव पिचड यांच्यासह राजूरचे सरपंच गणपत देशमुख, उपसरपंच गोकुळ कानकाटे, माजी सरपंच संतोष बनसोडे, पांडुरंग खाडे, सुरेश भांगरे, आकाश देशमुख आदींनी चौकशीची मागणी केली आहे. पोलिसांनी राजूर येथे चार ट्रक पकडल्याचे समजले आहे. याबाबत संबंधितांना विचारणा करून सत्यता पडताळून तथ्य आढळले तर योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचे यावेळी तहसीलदार मुकेश कांबळे म्हणाले आहेत.