अहमदनगर - बारामती ॲग्रोचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांना राज्य शासनाचा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा कर्जत येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस व कर्जतकर नागरिकांच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी बारामती ॲग्रोच्या विश्वस्त सुनंदा पवार उपस्थित होत्या.
राज्य शासनाचा वतीने दरवर्षी कृषी क्षेत्रामध्ये भरीव योगदान देऊन या क्षेत्रासाठी अतुलनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार देण्यात येतो. या वर्षी हा पुरस्कार बारामती ॲग्रोचे विश्वस्त राजेंद्र पवार यांना देण्यात आला. या निमित्ताने त्यांचा कर्जतमध्ये सन्मान करण्यात आला.
शेतकरी, बारामती अॅग्रो पुरस्काराचे खरे मानकरी -
हा पुरस्कार मिळाल्यामुळे आनंद झाला आहे. मात्र, या पुरस्काराचा मानकरी मी एकटा नसून सर्व शेतकरी बांधव व माझ्या बारामती अॅग्रो डेव्हलपमेंट ट्रस्ट या संस्थेचे सर्व कर्मचारी पदाधिकारी सदस्य असल्याची भावना व्यक्त केली. ते म्हणाले त्यांनी मला त्यांच्या माध्यमातून शेती आणि शेतकरी यांच्यासाठी वेगळे संशोधन करून काम करण्याची संधी उपलब्ध केली, ते या पुरस्काराचे खरे मानकरी आहेत. गेली पस्तीस वर्षे मी या क्षेत्रामध्ये ट्रस्टच्या माध्यमातून काम करत आहे. काम करत असताना नवीन तंत्रज्ञानाचा वापर, शेतीमधून पारंपरिक उत्पादन व परिस्थिती याचा मेळ घालून शेती व शेतकरी टिकण्यासाठी नेमके काय केले पाहिजे, याबाबत सातत्याने मी धडपड करत असतो. या माध्यमातून शेतकऱ्यांचे राहणीमान उत्पन्न वाढावे यासाठी प्रयत्न करत असताना सेंद्रीय शेतीबरोबरच मानवाला हानिकारक असणारे औषधांची फवारणी होऊ नये, त्यांचे आरोग्यही टिकले पाहिजे याचा पुरस्कार सातत्याने केला आहे. शेती क्षेत्रामध्ये रोज नवीन संशोधन केले जात आहे. वहीत दिसते तेवढे सोपे नाही यासाठी खूप अभ्यास आणि चिकाटी ठेवून काम करावे लागते, असे पवार म्हणाले.
आप्पासाहेब पवार, शरद पवारांचे मिळाले मार्गदर्शन -
राज्य तील कृषी क्षेत्रातील हा सर्वोच्च पुरस्कार मिळाला, यामुळे आम्हा सर्व कुटुंबीयांना निश्चित आनंद झाला आहे. मात्र, या यशामध्ये शेतकऱ्यांचा वाटा मोठा आहे, राजेंद्रदादा हे मितभाषी स्वभावाचे असून काम करण्यावर त्यांचा भर असतो. आदरणीय (स्व.) आप्पासाहेब पवार व शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र पवार यांनी शेतीच्या तंत्रज्ञानाचे धडे गिरविले. शेतीमध्ये शेतकऱ्यांसाठी विविध पद्धतीने संशोधन करताना शेती परवडली पाहिजे शेतकरी टिकला पाहिजे यासाठी सातत्याने ते प्रयत्न करत असतात, असे सांगून सुनंदा पवार यांनी कोणतीही पिक फळबागा यामध्ये अंजीर, द्राक्ष, लिंबू यासह विविध पिकांवर त्यांनी संशोधन करून नैसर्गिक अडचणींवर मात करून भरपूर उत्पादन घेण्यावर त्यांनी नेहमीच भर दिला. बारामती ॲग्रो डेव्हलपमेंट ट्रस्ट याच्या माध्यमातून राजेंद्र पवार हे गेली 35 वर्षे झाली शेती क्षेत्रामध्ये सातत्याने काम करत आहेत. या ट्रस्टमध्ये सात तालुके व कर्जत-जामखेड शेतकरी आता जोडले गेले आहेत. शेतीचे विविध प्रयोग व त्याची माहिती शेतकऱ्यांना देण्यासाठी ते सातत्याने सहली व इतर कार्यक्रमांचे आयोजन करत असतात असे त्यांनी सांगितले.