अहमदनगर - जगभरात दहशत माजवणाऱ्या कोरोना विषाणूवर तपकीर ओढणे हा जालीम उपाय असल्याचा शोध श्रीगोंद्यातील भाजप नेते आणि नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी लावला आहे. याबाबत त्यांनी स्वतःचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.
पूर्वीच्या काळात महिला आणि पुरुष तपकीर ओढत होते. या तपकिरीचा उग्र वास कोरोनाचा विषाणू नष्ट करण्यास उपयुक्त ठरेल, असा नागवडेंचा दावा आहे. आता त्यांच्या या शोधावर तज्ञांची काय प्रतिक्रिया येते याची सर्वांना उत्सुकता आहे.
हेही वाचा - जगभर पसरलेला कोरोना 'साथीचा रोग', जागतिक आरोग्य संघटनेची घोषणा
राजेंद्र नागवडे हे ज्येष्ठ नेते आणि राज्य सहकारी साखर संघाचे माजी अध्यक्ष दिवंगत शिवाजीराव नागवडे यांचा मुलगा आहे. ते साखर संघाचे विद्यमान संचालक आहेत. माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचे कट्टर विरोधक असणारे राजेंद्र नागवडे यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षात प्रवेश करून पाचपुते यांचा निवडणूक प्रचार केला होता. त्यांच्या पत्नी अनुराधा नागवडे या काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्य असून आजही त्या काँग्रेसमध्येच आहेत.