अहमदनगर - कोरोनामुळे पसरलेल्या महामारीचा वेगाने फैलाव होऊ लागल्यानंतर पुण्याहून आलेल्या एका कुटुंबाचे व त्याच्या शेजाऱ्यांसोबत वाद झाले. शेजारी असलेल्या मित्रांसोबत चेष्टा-मस्करी सुरू असताना त्याचे वादात रूपांतर झाले. नंतर हे वाद आपापसांत मिटल्यानंतर जमावाने येऊन आपल्या घरावर हल्ला केला, अशी तक्रार अर्जुन ढाकणे यांनी शेवगाव पोलिसांत दाखल केली आहे. 13 एप्रिलला रात्री 10 वाजता ही घटना घडल्याचे ढाकणे यांनी म्हटले आहे.
सचिन अशोक शिरसाठ, परसराम भगवान शिरसाठ, त्रिंबक विठोबा शिरसाठ, दिगंबर त्रिंबक शिरसाठ, रावसाहेब आश्रु शिरसाठ, सुदाम त्रिंबक शिरसाठ, दत्तात्रेय त्रिंबक शिरसाठ, संतोष राजू ढाकणे, मारुती नामदेव ढाकणे या अकरा जणांनी रात्री घरावर काठ्या, गज, पहार इत्यादी साधनांनी हल्ला चढवला असल्याचे अर्जुन ढाकणे यांनी तक्रारीत म्हटले आहे.
या हल्ल्यात हल्लेखोरांनी ढाकणे यांच्या घरावर केलेल्या हल्ल्यादरम्यान घरासमोर उभ्या असलेल्या 32 लाख रुपये किमतीच्या आलिशान चारचाकीचेही मोठे नुकसान केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. तक्रारकर्त्यांनी आरोपींच्या अटकेची मागणी केली आहे.