अहमदनगर - काँग्रेसचे ज्येष्ठ आणि राज्याचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील येत्या २७ एप्रिलला आपली राजकीय भूमिका स्पष्ट करणार आहेत, अशी माहिती त्यांनी आज शिर्डीत प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.
विखेंचे पुत्र सुजय विखे यांनी भाजपत प्रवेश केल्यामुळे काँग्रेसमधून त्यांच्यावर टीका सुरू होती. त्यामुळे ते पक्षावर नाराज झाले होते. ते अहमदनगर लोकसभा मतदानानंतर आपली राजकीय भूमिका स्पष्ट करणार असल्याचे म्हटले जात होते. त्यानुसार त्यांनी येत्या २७ एप्रिलला आपली राजकीय भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगितले. आज सकाळपासून ते आपल्या विधानसभा क्षेत्रातील गावा-गावात जाऊन कार्यकर्त्यांची भेट घेत आहेत. त्यामुळे विखे पाटील काँग्रेस सोडणार का? विखे कोणता झेंडा हाती घेणार? याकडे साऱ्या जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.