अहमदनगर - माझ्या मंत्रीपदाच्या निर्णयाचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांना असल्याचे वक्तव्य राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे. लोकसभा निवडणुकीत घुसमट झाली असली तरी जिल्ह्यातील दोन्ही लोकसभेच्या जागा जिंकल्याचे समाधान आहे. आता विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील बाराही जागांवर युतीचेच उमेदवार निवडून आणणार असल्याचा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला.
राधाकृष्ण विखे यांचा भाजपमध्ये केवळ औपचारिक प्रवेश उरला असताना आता त्यांना कोणते खाते मिळणार याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांचे आवडते कृषी खाते त्यांना दिले जाणार की वाढीव एफएसआय प्रकरणात अडचणीत आलेल्या प्रकाश मेहतांचे गृहनिर्माण खाते त्यांना देणार यावर अंदाज बांधले जात आहेत. मात्र, यावर विखेंनी सावध भूमिका घेत हा अधिकार मुख्यमंत्र्यांचा असल्याचे म्हटले आहे.
निळवंडे कालवे प्रश्नावर संगमनेर-अकोल्यातील प्रस्थापितांनी २५ वर्षांपासून केवळ राजकारण केले आहे. आता बंद पाईपलाईनची मागणी का? असा प्रश्न यावेळी विखेंनी उपस्थित केला आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करत सर्वांनी काम करावे असे सांगत थोरात-पिचडांना त्यांनी कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला.