अहमदनगर - सर्वत्र सावधगिरी पाळत अनलॉकच्या सहाव्या टप्प्यात म्हणजेच नोव्हेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत सर्वत्र 'अनलॉक' होईल, असे आश्वासक मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले आहे. राज्यातील सामान्य जनता सरकारच्या केंद्रस्थानी असून अनलॉकच्या प्रक्रियेत रोजगाराला प्रधान्य देणार असल्याचे त्यांनी म्हटले. अहमदनगरमध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
नागरिकांनी शिस्तीचे पालन केल्यास नोव्हेंबरच्या शेवटी सर्वत्र 'अनलॉक' करू शकतो, असे संकेत त्यांनी दिले. यात मंदिरं, स्विमिंग टॅंक आणि सिनेमागृह, आदींचा समावेश असेल. दरम्यान, दिवाळीनंतर शाळा सुरू होणार असल्याचे त्यांनी म्हटले. एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरीही सर्वांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. यामुळे लवकरच सर्वत्र 'अनलॉक' करता येईल, असे ते म्हणाले.
आरटीपीसीचे दर आठवडाभरात आठशे रुपयांवर
देशात स्वॅब चाचणीचे दर साडेचार हजारांवर असताना आपण महाराष्ट्रात 2200 रुपये आकारत आहोत. सध्या ते बाराशे रुपयांपर्यंत आणण्यात आलेत. वाढत्या मागणीने किटचे दर कमी झाल्याने पुढील आठवडाभरात हे दर आठशे रुपयांपर्यंत येतील, अशी माहिती टोपे यांनी दिली. तसेच मास्कचे दर एकोणीस रुपयांपर्यंत ठेवण्यासंदर्भात दिशादर्शक सूचना कंपन्यांना दिल्याचे ते म्हणाले. एन-95 मास्कचे दर दोनशे रुपये कसे असू शकतात. एव्हढी नफेखोरी महाराष्ट्राला मान्य नाही, असेही त्यांनी ठणकावले.
टीआरपी'चा खेळ करणाऱ्यांची कायदा गय करणार नाही
मधल्या काळात सरकार, महाराष्ट्र पोलीस यांना काही माध्यमातून लक्ष केले जात होते. पण टीआरपीची (टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट्स) पोलखोल झाल्याने आता 'दूध का दूध आणि पानी का पानी' झाले आहे. टीआरपीशी केलेला खेळ हा कायद्यावर धूळफेक करणारा असल्याने संबंधितांविरोधात कडक कारवाई करणार आहोत. माध्यमांचा स्वतःचा एक अधिकार आहे, मात्र लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाने आपली लोकशाहीप्रति असलेली जबाबदारी ओखळून वागले पाहीजे, असे टोपे यांनी सांगितले.
खडसे: राष्ट्रवादी योग्य व्यक्तींचे स्वागतच करतो
भाजपाचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे सध्या पक्षावर विशेष करून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज असल्याची चर्चा आहे. या परस्थितीत ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या येत आहेत. यासंदर्भात प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी खडसेंचे नाव न घेता 'राष्ट्रवादी पक्ष योग्य लोकांचे नेहमीच स्वागत करत आला आहे, असे वक्तव्य केले. असल्याचे सांगत खडसे मुद्यावर एक प्रकारे पृष्ठी देण्याचे काम केले आहे.