अहमदनगर - दक्षिणच्या जागेचा तिढा येत्या दोन ते तीन दिवसात सुटणार असल्याची माहिती दिलीप वळसे-पाटील यांनी अकोले येथे दिली. दक्षिणची लोकसभेची जागा राष्ट्रवादीनेच लढावी अशी कार्यकर्त्यांमधून मागणी होत आहे. यावरही त्यांनी भाष्य केले.
जागा वाटपाबाबत वरिष्ठ स्तरावर बोलणी चालू आहे. येत्या दोन-तीन दिवसात ही जागा कोण लढवेल याचे चित्र स्पष्ट होणार असल्याचे दिलीप वळसे-पाटील अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे म्हणाले.
गिरीश महाजन गेल्या काही दिवसांपूर्वी राहुरी येथे एका कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना म्हणाले होते, की शरद पवार यांना पंतप्रधान होण्याचे स्वप्न पडत आहे. त्यांचे हे स्वप्न आता तर पूर्ण होणार नसल्याचे बोलले होते. या विषयी पत्रकारांनी दिलीप वळसे यांना हा प्रश्न विचारला. त्यावर वळसे म्हणाले, पंतप्रधान कोण होणार? काय होणार हा नंतरचा भाग असून या देशातील लोकशाहीवर घाला घालण्यात येत आहे आणि हा घाला घालणाऱ्या शक्ती लोकांनी दूर केली पाहिजे.
पुढे ते म्हणाले की, देशातील सगळे पक्ष एकत्र येत असून आघाडी-महाआघाडी स्थापन करून केंद्रात सत्ता बदल होणार असून येत्या ६ महिन्यात राज्यात ही सरकार बदलणार आहे.