अहमदनगर (शिर्डी): राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे साईबाबा मंदिरात आगमन झाल्यावर (President Draupadi Murmu Sai Temple Visit) प्रथम त्यांनी द्वारकामाईचे दर्शन घेतले. समाधी मंदिर दर्शनानंतर गुरूस्थान मंदिर येथील निंबवृक्षास प्रदक्षिणा घातली. यावेळी द्रौपदी मुर्मू यांनी साईबाबांची पाद्यपूजा आणि आरती केली. साईबाबा संस्थानच्या वतीने साईबाबांची मूर्ती आणि शाल देऊन राष्ट्रपती मुर्मू यांचा सन्मान करण्यात आला. (Saibaba Samadhi Darshan by Draupadi Murmu)
राष्ट्रपतींची संग्रहालयाला भेट: साईबाबांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या वस्तू ठेवण्यात आलेल्या साईबाबा वस्तुसंग्रहालयात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भेट दिली. यावेळी साईबाबा संस्थानच्या तदर्थ समितीचे अध्यक्ष सुधाकर यार्लगड्डा आणि साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवाशंकर यांनी राष्ट्रपतीना वस्तुसंग्रहालयातील वस्तू आणि प्रतिमांविषयी माहिती दिली.
राष्ट्रपतींनी घेतली साईभक्तांची भेट : साई दर्शनानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा गाड्यांचा ताफा साई मंदिरात परिसरातून बाहेर निघाला. साई मंदिराच्या 1 नंबर गेट समोरील महामार्गावर राष्ट्रपतींची गाडी येताच तिथे त्यांना बघण्यासाठी थांबलेल्या साईभक्तांची द्रौपदी मुर्मू यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी शंभर मीटर पायी चालत जाऊन साईभक्तांना अभिवादन केले. दरम्यान भाविकांनी जय साईराम आणि वंदे मातरम्च्या घोषणा देत राष्ट्रपतींच्या या साधेपणाचे कौतुक केले.
साई प्रसादालयात केले भोजन : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शिर्डीत येऊन साईसमाधीचे दर्शन घेतले. अनेक भक्त जसे साईदर्शनानंतर साई संस्थानच्या प्रसादालयात जाऊन भोजन घेतात तसे राष्ट्रपतींनीही येथे भोजन केले. साई संस्थाननेही त्यासाठी खास तयारी केली होती. राष्ट्रपतींसाठी मटकीची उसळ, मेथीची भाजी, पिठले वडी, असे महाराष्ट्रीयन जेवणाचे ताट करण्यात आले होते. त्यात भजे-पावही होते. याच बरोबरीने पापड, लोणचे आणि खास बनवलेली शेंगदाणा चटणी राष्ट्रपतींना वाढण्यात आली होती. खास महाराष्ट्रीयन पध्दतीने केलेली शेंगदाणा चटणी राष्ट्रपतींना विशेष आवडली. त्यामुळे राष्ट्रपतींनी ही चटणी कशी बनविली जाते याची चौकशी साई संस्थानच्या आचाऱ्यांकडे करत ती बनविण्याची पध्दत जाणून घेतली. राष्ट्रपतींनीही भोजन केल्यानंतर दररोज किती लोक जेवतात याची माहिती घेत भोजनाच्या गुणवत्तेचे आणि व्यवस्थेचे कौतुक केले.
हेही वाचा:
- Droupadi Murmu Shirdi Visit : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतले साई समाधीचे दर्शन, गाडीतून उतरून भाविकांची घेतली भेट
- President Draupadi Murmu : संघर्ष करून पुढे जा; समाजबांधवांचा विकास करा - राष्ट्रपतींचा आदिवासी समुहाच्या प्रतिनिधींशी संवाद
- Draupadi Murmu : संस्कृती आणि राष्ट्रभक्तीच्या सांस्कृतिक केंद्राचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते लोकार्पण