अहमदनगर - पर्यावरण वाचवणे ही सरकारसोबत आपलीही जबाबदारी असल्याचे वक्तव्य आदर्श गाव हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी केले. आधुनिकीकरणाच्या नावाखाली आपण अधोगतीकडे चाललो असून, पर्यावरणाचा ह्रास ही जागतिक समस्या असल्याचे ते म्हणाले.
पर्यावरणाचा ह्रास ही जागतिक समस्या असून, पर्यावरणाचे रक्षण करणे ही सरकारसोबत आपलीही जबाबदारी आहे. पर्यावरण दिन साजरा करण्याची नव्हे तर कृती करण्याचा दिन असल्याचे पवार म्हणाले. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ईटीव्ही भारतने त्यांच्याशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी मत व्यक्त केले. भारतासारख्या देशात शहरी आणि ग्रामीण भेदाभेद समोर येत आहे. ग्रामीण भागातील अनेक असुविधामुळे रोजगारासाठी लोक शहराकडे धावत आहेत. मात्र, तिथेही वाढत्या लोकसंख्येमुळे असुविधा वाढत आहेत. हा समतोल साधने गरजेचे असल्याचे पवार म्हणाले.