अहमदनगर - कर्जत तालुक्यातील श्री अंबालिका शुगर कारखाना या खासगी कारखान्याचे रसायन मिश्रीत पाणी लोहकरा ओढ्यात सोडले जात असल्याचा आरोप परिसरातील शेतकऱ्यांनी केला आहे. यामुळे शेती, विहिरी, जनावरे बाधित होत असल्याने कारखान्यावर कारवाईची मागणी केली जात आहे. हा खासगी साखर कारखाना असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी निगडित असल्याचे बोलले जात आहे. यान्ंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून या परिसराची पाहणी करण्यात आली आहे.
हेही वाचा - तिचे हस्ताक्षर आहे मोत्याहूनही सुंदर!
प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारखान्याची आणि सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्याची पाहणी करून पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. या कारखान्याशी पवारांचे नाव जोडले जात असल्याने स्थानिक शेतकरी उघडपणे बोलत नाहीत तर, प्रदूषण मंडळाचे अधिकाऱ्यांनीही कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला आहे. अंबालिका कारखाना परिसरातील भांबोरा ग्रामपंचायतीने याबाबत कारखान्याकडे तक्रार केली असली तरी कारखान्याकडून समाधानकारक उत्तर मिळत नाही. याबाबत काही सामाजिक कार्यकर्तायांनी उघड तक्रार करत कारखान्यावर कारवाईची मागणी केली आहे. तर पर्यावरण अभ्यासकांनी अनेक कारखान्यातून दूषित आणि केमिकलयुक्त सांडपाणी नदी, नाले-ओढ्यात सोडणे पर्यावरणासाठी घातक असल्याचे मत नोंदवले आहे.
हेही वाचा - अहमदनगर मनपा पोटनिवडणुक : भाजपकडून महाविकास आघाडीला 'धोबीपछाड'
नगर जिल्ह्यात अनेक सहकारी आणि खासगी साखर असून हे सर्व साखर कारखाने त्या त्या तालुक्यातील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या ताब्यात अथवा मालकीचे आहेत. राज्यातल्या मोठ्या नेत्यांच्या खासगी साखर कारखान्यांची मोठी साखळी असून या सर्व राजकीय धेंडांच्या मनमानीमुळे स्थानिकांची शेती, आरोग्य धोक्यात आले असल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठोस कारवाई करण्याची मागणी होत आहे.