शिर्डी - साई बाबांच्या शिर्डीमध्ये लोक दर्शनासाठी जातात. मात्र तिथे इतर अनैतिक उद्योगही होत असतात याचा सुगावा आता पोलिसांना लागला आहे. अनैतिक अवैध व्यवसाय सुरु असलेल्या शिर्डीतील सहा हॉटेलवर एकाचवेळी शिर्डीसह अहमदनगर जिल्ह्यातील पोलिसांनी रात्री छापा टाकला. या छाप्यामध्ये तब्बल 15 पीडित मुलींची सुटका करण्यात आली आहे. तसेच हॉटेल चालकांसह ग्राहक म्हणून आलेल्या 11 पुरुषांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेने शिर्डीसह जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
अनैतिक अवैध व्यवसाय सुरू - शिर्डीतील काही हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात अनैतिक अवैध व्यवसाय सुरू असल्याची माहिती श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांना गुप्त खबऱ्यामार्फत मिळाली होती. या महितीच्या आधारे पोलिस अधिकारी संदीप मिटके यांनी इतर पोलिसांना सोबत घेतले. अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव, नेवासा, राहुरी, श्रीरामपूर, राहाता, शिर्डीसह अन्य तालुक्यातील पोलीस अधिकाऱ्यांनासह कर्मचाऱ्यांची वेगवेगळी सहा पोलिस पथके तयार करण्यात आली. त्यानंतर शिर्डीतील अनैतिक अवैध व्यवसाय सुरू असलेल्या हॉटेलमध्ये डमी ग्राहक म्हणून काही पोलिसांना पाठवले होते. खबऱ्यामार्फत मिळाली माहिती खरी असल्याचे समजले. पोलिस अधिकारी संदीप मिटके यांच्यासह पोलिस पथकांनी एकाचवेळी शिर्डीत अनैतिक अवैध व्यवसाय सुरू असणाऱ्या सहा हॉटेलवर 5 मे रोजी रात्री 8 वाजता छापा टाकून तब्बल 15 पिडित मुलींची सुटका केली आहे.
शिर्डीमध्ये मोठी कारवाई - हॉटेल चालकासह ग्राहक म्हणून आलेल्या 11 पुरुषांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या सगळ्या आरोपींवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिर्डीतील अनैतिक अवैध व्यवसाय सुरु असलेल्या सहा हॉटेलवरही पोलिसांनाकडून कारवाई करण्यात आली आहे. ही सर्व हॉटेल सिल करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा अधिकारी यांच्याकडे सदर करण्यात येणार असल्याची माहिती श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी यावेळी दिली आहे. शिर्डीमध्ये मोठी कारवाई झाल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे.