अहमदनगर - राहुरी पोलीस ठाण्यातील कर्मचारी विशाल हापसे यांच्या आत्महत्येप्रकरणी आता पोलिसांनी त्यांची पत्नी आणि प्रियकराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच पत्नीस अटक करण्यात आली आहे. मात्र, तिचा प्रियकर फरार आहे.
20 नोव्हेंबरला केली होती आत्महत्या -
पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे मानसिक तणावातून राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी विशाल हापसे यांनी आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी विशाल यांचे बंधू देवेंद्र हापसे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पत्नी सोनाली व तिचा प्रियकर पोलीस नाईक विशाल खंडागळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत विशाल राम हापसे (वय-३५) हे अहमदनगर पोलीस दलात कार्यरत होते. ते बदली होऊन नुकतेच राहुरी पोलीस ठाण्यात गोपनीय विभागात कार्यरत होते. मात्र, २० नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास त्यांनी विष पिऊन आत्महत्या केली. या घटनेने पोलीस दलात खळबळ उडली होती.
हेही वाचा - राज्यात लस वितरणासाठी टास्क फोर्सची स्थापना; पंतप्रधानांच्या बैठकीत मुख्यमंत्री ठाकरेंची माहिती
विशाल हापसे यांनी पत्नी सोनाली हिचे पोलीस नाईक विशाल खंडागळे याच्यासोबत अनैतिक संबध असल्याचे समजले. नंतर मृत विशाल यांना पत्नीच्या प्रियकराने जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे मानसिक तणावातून विशाल हापसे यांनी आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येस सोनाली आणि खंडागळे हे दोघे जबाबदार आहेत. त्याबाबतची तक्रार मृत विशाल यांचे बंधू देवेंद्र यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिली असून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता राहुरी पोलिसांनी हापसे यांच्या पत्नीला अटक केली आहे. तर तिचा प्रियकर खंडागळे फरार आहे.