अहमदनगर - वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे नगर जिल्ह्यामध्ये रविवारपासून चौदा दिवसांचा जनता कर्फ्यू घोषित करण्यात आला आहे. मात्र, कर्फ्यू दरम्यानही अनेक लोक रस्त्यांवर विनाकारण फिरताना दिसून आले. तसेच अनेक भाजीपाला विक्रेते, फळ विक्रेते किंवा काही दुकानदार यांनी आपले दुकानही उघडे ठेवण्याचा प्रयत्न केला. विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्यांविरोधात आता पोलीस प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. अशा लोकांवर वाहन जप्ती, दंड व गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.
कडक कारवाई
चौदा दिवसांचा हा जनता कर्फ्यू असून तो नागरिकांनी कडकपणे पाळावा, असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शनिवारी झालेल्या आढावा बैठकीत केलं होतं. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश पारित करून अनेक जीवनावश्यक गोष्टींवर प्रतिबंध घातले आहेत. सकाळी सात ते दहा वाजेपर्यंत म्हणजे जवळपास चार तास भाजीपाला, दूध, किराणा दुकान चालू ठेवण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. भाजीपाला विक्रेते यांना बाजार न भरवता घरोघरी जाऊन भाजी विक्री करावी, असे सांगण्यात आलेले आहे. मात्र, तरीही अनेक चौकांमध्ये भाजीपाला विक्रेते बसून विक्री करतात. त्याठिकाणी खरेदीसाठी मोठी गर्दी उसळल्याचे चित्र कायम आहे. त्यामुळे आता पोलीस ऍक्शन मोडमध्ये आले असून या सर्वांवरच कडक कारवाई केली जाईल, असे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.