अहमदनगर - वादग्रस्त कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांना आणखी एक मोठा दिलासा मिळाला आहे. अहमदनगरच्या पीसीपीएनडीटी (लिंग निवडीस प्रतिबंध समिती) समितीने सायबर सेलकडे इंदोरीकर यांच्या कीर्तनाच्या व्हिडीओची सत्यता तपासण्यासाठी पत्र दिले होते. अहमदनगर सायबर सेलकडून याबाबत समितीला अहवाल देण्यात आला आहे. वादग्रस्त विधान असलेला व्हिडिओ युट्युबवर उपलब्ध नसल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
सायबर सेलच्या अहवालामुळे सध्यातरी इंदोरीकरांवर पीसीपीएनडीटी समिती कुठलीही कारवाई करण्यास नकार देत आहे.
काय आहे प्रकरण?
'सम तिथीला स्त्रीसंग झाला तर मुलगा आणि विषम तिथीला झाला तर मुलगी होते,' असे वक्तव्य इंदोरीकर यांनी एका कीर्तनात केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे इंदोरीकर महारांजावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. हा गुन्हा सिद्ध झाल्यास त्यांना तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षाही होऊ शकते.