अहमदनगर - पारनेर तालुक्यातील भोयरे गांगर्डा येथील दादा उर्फ शशिकांत मारुती सातपुते या व्यक्तीने पुण्यातील एका टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीला फसवण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केले आहे. आरोपीकडून पोलिसांनी २ कोटी ७० लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
काय आहे प्रकरण -
पुण्यातील महेश प्रताप खोबरे यांची पुण्यातील पिसाई येथे धर्मावत पेट्रोल पंपाजवळ टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनी आहे. सातपुते याने खोबरे यांच्या कंपनीकडून बावीस आलिशान इनोवा क्रेस्टा, बीएमडब्ल्यू, स्कॉर्पिओ या गाड्या भाड्याने घेतल्या. त्याने यातील काही गाड्या परस्पर इतर लोकांकडे गहाण ठेवल्या तर काही स्वस्त किंमतीत विकून टाकल्या. मार्च 2020पासून डिसेंबर 2020 दरम्यान या गाड्या त्याने 'महाबली एन्टरप्राइज' या फर्मच्या नावाने भाड्याने घेतल्या. सुरुवातीला तीन महिने त्याने गाड्यांचे भाडे दिले. मात्र, नंतर त्याने भाडे देणे बंद केले. भाडे येणे बंद झाल्यावर टूर्स अँड ट्रॅव्हल कंपनीच्या संचालकाने याबाबत सुपा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सुपा पोलीस आणि जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखेने तपास करून आरोपी शशिकांत मारुती सातपुते याला जेरबंद केले. पोलिसांनी आतापर्यंत 16 गाड्या शोधून जप्त केल्या आहेत. या गाड्यांची किंमत २ कोटी ७० लाखांपेक्षा जास्त आहे.
खंडणीसारख्या गुन्ह्यात एका गाडीचा वापर -
यातील एक गाडी एका खंडणीच्या गुन्ह्यात एमआयडीसी पोलिसांनी अगोदरच जप्त केली आहे. या पद्धतीने आरोपीने अनेकांना फसवले असल्याची शक्यता असून अजूनही काही आलिशान गाड्या जप्त होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या गुन्ह्यात त्याला काही जण मदत करत असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरोपींची संख्या वाढू शकते.