अहमदनगर - आमच्या उमेदवारांची पात्रता विचारतात. पण २ वाक्ये बोलता न येणाऱ्याची पात्रता विचारत नाहीत. आमचेच बंधू पवारांची लाचारी करत आहे. पार्थ सरस की रोहित असे विचारल्यानंतर पवार महत्त्वाचे असल्याचे सांगत आहेत. अरे किती दिवस पवारांची चमचेगिरी करणार? असा प्रश्न करत ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि बंधू धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे.
डॉ. प्रीतम मुंडे यांची पात्रता विचारता पण २ वाक्ये बोलता न येणाऱ्याची पात्रता विचारात नाहीत. पार्थ पवार आणि रोहित पवार यांच्यामधील कोणता नेता उत्कृष्ट आहे? असा प्रश्न आमच्या भावाला विचारला. त्यावेळी ते म्हणाले, पार्थ आणि रोहित महत्वाचा नाही तर पवार महत्वाचे आहेत. अरे किती पवारांची चमचेगिरी करणार? तुम्हाला तुमच्या पक्षातील घराणेशाही दिसत नाही. तुमच्या पक्षातील अर्धा डझन उमेदवारी घरातच दिली. इकडे विखे यांची घराणेशाही तुम्हाला दिसते, अशी टीका पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केली.
आमच्या उमेदवारांवर आक्षेप घेणाऱया दरिद्री लोकांना त्यांची जागा दाखवा. पण लोक हुशार झाले आहेत. आमचे विरोधक म्हणतात हे बाहेरचे आले. यांना कळते का कोण बाहेरचे आहे? आम्ही येथेच जन्मलो आहोत आणि लहानाचे मोठे झाले आहे. बीड आणि अहमदनगरमध्ये शेजारी शेजारी २ डॉक्टर खासदार होणार आहेत.
पंकजा मुंडे यांनी भाषणात धनंजय मुंडे यांच्या मागच्या दाराने सभागृहात झालेल्या प्रवेशावरही टीकास्त्र सोडले. वडिलांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुढे पाठवून सुरुंगावर बसवले आणि स्वतः भाजपचे आमदार राहिले. त्यांचा निवडणुकीत पराभव झाल्यावर धनंजय मुंडे मागच्या दराने गेल्याची टीका त्यांनी केली. आता जिल्ह्यात राम शिंदे, शिवाजी कर्डीले, मोनिका राजळे यांना त्रास देण्याचे काम सुरू असल्याची टीका पंकजा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केली. विखे घराण्याचा द्वेषातुन काहीही करून पक्षाचा खासदार करायचा हे पवारांकडून सुरू असले तरी सुजय विखे या माझ्या भावाला मी निवडून आणणारच असा विश्वास पंकजा मुंडे यांनी भाषणात व्यक्त केला.