अहमदनगर : एएसके फाउंडेशन मुंबई व बायक संस्था संचलीत समृद्ध किसान प्रकल्प अंतर्गत अकोले तालुक्यातील कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी वसलेल्या बारी, जहागीरदार वाडी, चिचोंडी, मूरशेत, पांजरे या आदिवासी गावांमध्ये जलस्रोत निर्मितीसाठी व पावसाचे पाणी साठवून ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न होत आहेत. या भागात गेल्या वर्षभरात सुमारे 20 सामूहिक शेततळ्यांची निर्मिती करण्यात आली आहे. एका शेततळ्याची पंधरा लाख लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. 20X20X2. 50 मीटर या आकाराचे शेततळे जेसीबी आणि पोकलेन यांच्या साह्याने बनवण्यात आले आहेत.
20 शेततळ्यांची निर्मिती : प्रकल्पांतर्गत येणाऱ्या गावांमध्ये सुमारे 20 शेततळ्यांची निर्मिती करण्यात आलेली आहे. एकूण या तळ्यांमध्ये तीनशे लाख लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. या पाणीसाठ्याचा वापर करून सुमारे पन्नास एकर क्षेत्र बागायती झाले आहे. काही शेतकरी या तलावांमध्ये मत्सशेती करत आहेत. फळबाग लागवडीसाठी वर्षभर लागणारे पाणी आता उपलब्ध झाल्यामुळे आंबा, चिकू, फणस, काजू, व विविध मसाल्याची पिके लागवडी शेतकरी आता करू लागले आहेत. वर्षभर पाणीसाठा टिकवून राहण्यासाठी त्यामध्ये प्लास्टिक कागदाचे अस्तरीकरण करण्यात आले आहे. पाळीव प्राणी किंवा जंगली प्राणी या पाण्यात पडून त्यांचा मृत्यू होऊ नये, त्यासाठी बाजूने तारेचे कंपाउंड बनवण्यात आले आहे.
80 ते 100 कुटुंबांना फायदा : या भागातील बहुसंख्य शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. पावसाळ्यात भात हे मुख्य पीक या भागात घेतले जाते. पावसाने दडी मारल्यास भात पिकाचे नुकसान होऊ नये, यासाठी या शेततळ्यातून शेतकरी पिकांना पाणी देत असतात. खरीप हंगामात अचानक पाऊस गायब झाल्यानंतर भात रोपवाटिका जोपासणे शेतकऱ्यांना पाण्याअभावी कठीण होते. परंतु यावर्षी या संकटाला शेततळ्यातील पाणी उपलब्ध असल्यामुळे शेतकऱ्यांना यशस्वीपणे तोंड देता आले. पावसाच्या पाण्याअभावी मरून जाणारे भात रोपे आता शेतकऱ्यांना जगवणे शक्य झाले आहे. या शेततळ्यांच्या मालिकेतून सुमारे 80 ते 100 कुटुंबांना फायदा होत आहे.
शेतकऱ्यांना मोठा दिलासा : पावसाळी हंगाम संपल्यानंतर शेतकऱ्यांना हाताला फारसे काम उरत नाही. त्यामुळे या भागातून मोठ्या प्रमाणावर मजुरीसाठी लोक स्थलांतर करतात. शेततळ्यांचे मोठे काम प्रकल्पातून उभे राहिल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. खरीप हंगाम सोडून रब्बी हंगामातही विविध पिकांचे नियोजन शेतकरी करताना दिसत आहे. गहू, हरभरा, वाटाणा, टोमॅटो, वांगी, मिरची, कोबी, फ्लावर यासारखी विविध पिके या भागात शेतकरी मोठ्या प्रमाणावर करत आहेत.
पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न सुटला : याशिवाय उन्हाळ्यात पाळीव प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न मोठ्या प्रमाणावर सुटला आहे. आदिवासी भागातून या कामांची मोठ्या प्रमाणावर मागणी होत असून शेतकऱ्यांना फायदा होत आहे. शेतकरी वर्गातून या कामांबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे. प्रकल्पाला योग्य दिशा आणि मार्गदर्शन एएसके फाउंडेशन मुंबईचे सी. एस .आर. हेड सिद्धार्थ अय्यर व प्रकल्प समन्वयक शिवाजी आदमाने यांच्याकडून दिले जात आहे.