अहमदनगर- जलयुक्त शिवार अहवालात कॅगने फक्त सूचना केल्यात. भ्रष्टाचाराचे आरोप नाहीत, असे राज्याचे माजी जलसंधारण मंत्री तथा अहमदनगरचे पालकमंत्री राम शिंदे यांनी स्पष्ट केले. राम शिंदे यांनी जलयुक्त शिवार योजनेबाबत ठाकरे सरकारने केलेल्या आरोपांवर आणि कॅगच्या अहवालावर आपली प्रतिक्रिया दिली. दरम्यान, त्यांनी उद्धव ठाकरे यांचे महाविकास आघाडी सरकार याबाबत राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे.
फडणवीस सरकारमध्ये राज्याचे जलसंधारण मंत्री असतांना राम शिंदे यांनी जलयुक्त शिवार योजना राज्यभर राबवली. त्यासाठी मोठा निधी सरकारने खर्च केला आहे. मात्र या योजनेच्या कार्यपद्धती आणि फलनिष्पत्तीवर महाविकास आघाडी सरकारने आक्षेप नोंदवला. आणि बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एसआयटी नेमून चौकशी नेमण्याचा निर्णय घेतला आहे. कॅगने दिलेल्या अहवालावरून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
मात्र माजी जलसंधारण मंत्री म्हणून या योजनेचा कार्यभार पाहिलेल्या राम शिंदे यांनी यामागे फक्त राजकारण खेळले जात असल्याचे म्हटले आहे. कॅगने योजनेत भ्रष्टाचार झाला आहे, असे म्हटलेले नाही. कॅगने केवळ काही सूचना केल्याचे सांगितले आहे. जलयुक्त शिवार योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घेतलेला आहे. यंदा सलग पाऊस आहे, मात्र दोन पावसात अंतर असताना जलयुक्त शिवार योजना लाभदायक असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.