अहमदनगर- केंद्रीय कृषी विभाग आणि महाराष्ट्र फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या माध्यमातून राहुरी तालूक्यात कांदा खरेदी केंद्राची सुरूवात करण्यात आली आहे. शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रयत्नातून शिर्डी लोकसभा मतदारसंघात ८ फार्मर प्रोड्यूसर कंपन्या सुरू होत आहेत. त्यामुळे शेतकऱयांच्या पिकाला किमान हमीभाव मिळणे आता सहज शक्य होणार आहे.
शेतकरी आपल्या शेतात काबाडकष्ट करून पिक घेतो. मात्र, त्यांच्या घामाचे दाम त्याला कधी मिळतच नाही. शेतकरी शेती पिकवतो. मात्र, भाव दलाल ठरवतात. शेतकरी पिक काढतो, वाहून नेत बाजारात नेतो त्यामुळे वाहतूक खर्च, हमाली, अडत, कांद्याची गोणी असा सगळा खर्च त्याच्या माथी पडतो. त्यामुळे हातात काही शिल्लक राहतच नाही. यावर मात करण्यासाठी फार्म प्रोड्यूसर कंपनीच्या माध्यमातून शेतकऱयांकडील कांदा बांधावरच खरेदी केला जाणार आहे. तसेच प्रतवारीनुसार दरही जास्त दिला जाणार आहे.
आज सुरू करण्यात आलेल्या या कांदा खरेदी केंद्रामुळे शेतकऱयांचा बराच पैसा आणि श्रमही वाचणार आहेत. त्यामुळे शेतकरीही आनंदी झाले आहेत. सरकारने सुरू केलेली ही योजना नक्कीच शेतकऱयांसाठी फायद्याची आहे. त्यामुळे दलालांच्या विळख्यात असलेला शेतकरी जेव्हा मुक्त होईल तेव्हाच शेतकऱयांनाही 'अच्छे दिन' येतील यात शंका नाही.