अहमदनगर - लॉकडाऊनमध्ये बंदोबस्तावर असलेल्या पोलिसाचा रक्तदाब वाढल्याने त्यांची तब्येत गंभीर झाली. त्यांना तातडीने साईदीप रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले. कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी शासनाने लॉकडाऊन केले. नागरिकांनी बाहेर येऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. २४ तास पोलीस कर्तव्यावर तैनात आहेत. तरीही लोक ऐकत नसून रस्त्यावर येतात.
वरिष्ठांचे आदेश, बेशिस्त नागरिक तर दुसरीकडे संसर्गजन्य आजाराची भीती, कुटुंबाची काळजी, शारीरिक व मानसिक थकवा यामुळे पोलीस कर्मचारी वैतागले असले तरी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडतात. अशा वेळेस पोलिसांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.
भिंगार कँम्प पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेले पोलीस नाईक प्रमोद गोपाळ पवार हे औरंगाबाद रस्त्यावरील डीएसपी चौकाजवळ बंदोबस्त करीत असताना त्यांना अचानक रक्तदाबाचा त्रास जाणवू लागला. याबाबत त्यांच्या सहकाऱ्यांनी वरिष्ठांना कळवून पवार यांना तातडीने साईदीप रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग, अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील, कॅम्प पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पाटील यांनी रुग्णालयात जाऊन डॉक्टरांची भेट घेत पवार यांच्या तब्येतीची चौकशी केली. तसेच प्रमोद पवार यांच्या उपचाराकरीता पोलीस खात्याच्या 'वेलफेअर निधी'मधून मदत करणार असल्याचे सांगितले.
पोलीस आपले प्राण पणाला लावून नागरिकांच्या जीवाच्या रक्षणाकरिता झटत असतात, हे पाहून तरी नागरिकांनी शासनाचे आदेश पाळून घरातच थांबावे, असे आवाहन पोलिसांच्यावतीने करण्यात आले आहे.