अहमदनगर - जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन व्हेंटिलेटर आदी सुविधात वाढ करण्यात आली आहे. तसेच आयसीयु बेड्स ही पुरेशा संख्येने उपलब्ध ठेवण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांनी दिली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला जिल्ह्यात सरासरी केवळ 80 ते 100 रुग्ण आढळून येत होते. मात्र, त्यानंतर महिनाभरात हा आकडा आता 300 रुग्णांच्यावर पोहोचला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नागरिक, दुकानदार, व्यावसायिक यांच्यासाठी अनेक निर्बंध आणले असून वाढती रुग्णसंख्या पाहता आता जिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांवर उपचार सुविधा वाढविण्यावर लक्ष केंद्रीत केले असल्याचे त्यांनी सांगितले.
पुरेशी यंत्रणा उपलब्ध केली जात आहे -
सद्यस्थितीत जिल्हा रुग्णालयात तसेच जिल्ह्यात 200 ऑक्सिजन बेड असून ते 500 पर्यंत वाढवली जात आहेत. 75 व्हेंटिलेटर उपलब्ध असले, तरी गरज पडल्यास खाजगी रुग्णालयात मार्फत ही संख्या 350 पर्यंत वाढवता येणार आहे. तसेच 55 आयसीयू बेड सध्या उपलब्ध असल्याचे डॉ. पोखरणा यांनी स्पष्ट केले. अनेक कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची गरज पडत असते. त्या दृष्टीने गरजेची असलेली पुरेशी यंत्रणा उपलब्ध केली जात असल्याचेही पोखरणा म्हणाले.
कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर जास्त भर -
एका पॉझिटीव्ह रुग्णामागे त्याच्या संपर्कात आलेल्या 20 ते 25 जणांची कोरोना टेस्ट केली जात आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर आरोग्य विभाग जास्तीत जास्त काम करत आहे. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, लग्न समारंभ, हॉटेलिंग टाळावे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सकांनी केले आहे.
लसीकरणानंतरही काळजी घ्या -
कोविड लसीकरणाचे दोन डोस घेतल्यानंतरही काळजी घेणे गरजेचे असते. लसीकरणानंतर अँटीबॉडीज तयार होण्यास काही कालावधी लागतो. त्या कालावधीत नेहमीप्रमाणेच मास्कचा वापर, सॅनिटायजेशन, सोशल डिस्टंसिंग पाळणे गरजेचे असल्याचे डॉ. पोखरणा यांनी सांगितले. जिल्ह्यातील शाळा सुरू ठेवण्याबाबत डॉ.पोखरणा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती माहिती घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल देणार आहेत. शहरासह ग्रामीण पातळीवर ग्रामीण रुग्णालये प्राथमिक आरोग्य केंद्रातून कोविड लसीकरणाला प्रारंभ झाला आहे.
हेही वाचा - एमपीएससी परीक्षा प्रकरण : विद्यार्थी संतप्त, आमदार पडळकरांना पोलिसांनी घेतले ताब्यात