अहमदनगर - भाजपमध्ये प्रवेश केलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. विखे पाटलांचा उमेदवारी अर्ज वैध ठरवण्यात आला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे यांनी याबाबत माहिती दिली.
शिर्डी मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश थोरात यांनी विखे पाटलांचे नोटरी अधिकारी दिलीप निघुते यांच्या नोटरीचे नुतनीकरण झालेले नाही. त्यांचा अर्जही साक्षांकित नाही, असा आक्षेप घेत तक्रार दाखल केली होती. याबाबत राहाता येथील तहसीलदार कार्यालयात सुनावणी झाली.
हेही वाचा - तावडेंबाबत नियतीचा अजब खेळ, अशोक चव्हाणांचा तावडेंना टोला
सुनावणीवेळी दोन्ही पक्षांच्यावतीने युक्तीवाद करण्यात आले. विखे पाटलांची नोटरी अधिकारी अँड. निघुते यांनी त्यांच्या नोटरी अधिकाराचे नुतनीकरण 2021साला पर्यंत झाल्याचे सिध्द केले. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधीत्व कायदा 1951मधील कलम 36अन्वये काँग्रेस उमेदवाराचा तक्रार अर्ज फेटाळला व राधाकृष्ण विखे यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरवला.
मात्र, अधिकाऱ्यांनी दबावाखाली हा दिलेला निकाल दिला आहे. या विरोधात उच्च न्यायालयात जाणार असल्याचे, काँग्रेसचे उमेदवार सुरेश थोरात यांनी सांगितले.