अहमदनगर - कोरोनाच्या संकटात शाळा प्रशासन आणि सरकारकडून ऑनलाईन शिक्षणावर भर दिला जात आहे. मात्र, आदिवासी भागातील अकोले तालुक्यातील मुथाळने या गावात इंटरनेटच नव्हे तर मोबाईलची सेवा मिळत नाही. अशीच परिस्थिती संगमनेर तालुक्यातील दहा गावांमध्ये आहे.
आदिवासी भागातील अकोले तालुक्यातील मुथाळने या गावात कोणतेही दूरसंचार कंपनीचे टॉवर नाही. अशा परिस्थितीत मोबाईलला नेटवर्क नसल्याने शिक्षण कसे घ्यावे, हा विद्यार्थ्यांसमोर प्रश्न निर्माण झाला आहे.
संगमनेर तालुक्यातील पठार भागातील दहाहून अधिक गावात अद्याप मोबाईलचे नेटवर्क व्यवस्थित मिळत नाही. ग्रामस्थांना मोबाईलच्या नेटवर्कसाठी डोंगरावर अथवा दूर ठिकाणी जावून संपर्क साधावा लागतो. अकोले तालुक्यातील डोंगरी भागातील ३ हजार २०० लोकसंख्या असलेल्या मुथाळणे या गावात दूरसंचार सेवेच्या अभावामुळे नागरिकांची मोठी अडचण होत आहे. विद्यार्थ्यांना शालेय अभ्यास करणे शक्य होत नाही. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच सुख असो दुःखद प्रसंगी ग्रामस्थांना बाहरेच्या व्यक्तींशी संपर्क करणे शक्य होत नाही. मुथाळणे येथे मोबाईल नेटवर्क मिळण्यासाठी दूरंसचार कंपनीचे टॉवर उभारण्यात यावे, ही विद्यार्थी आणि पालकांनी मागणी केली आहे. गावांजवळ असलेल्या मोबाईल टॉवरची क्षमता वाढवावी या मागणीसाठी ग्रामस्थांनी उपोषणी केले होते. तरीही हा प्रश्न अद्याप सुटला नाही.
गावातील ग्रामस्थ सांगतात, की गावात तीनशे ते चारशे विद्यार्थी आहेत. त्यांना शिक्षण घेणे शक्य होत नाही. ग्रामपंचायत ऑनलाईन करण्यासाठी गावात यंत्रणा नाही. निवडणुकीत मतांची आकडेवारी सरकारला देण्यासाठी तलाठ्यांना ५ किमी दूर अंतरावर जावे लागत होते. १२ वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्याने सांगितले, की अनेक विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित आहेत. त्यासाठी सरकारने नियोजन करावे.
राज्याचे नेतृत्त्व करणारे मधुकर पिचड आणि बाळासाहेब थोरातांच्या मतदार संघातल्या काही गावांमध्ये मोबाईलचे नेटवर्कही मिळणे अशक्य असल्याचे चित्र आहे. गावात इंटरनेट आणि मोबाईल टॉवर मिळाले नाही, तर ग्रामस्थांन पुन्हा आंदोलन करण्याच्या पावित्र्यात आहेत.