अहमदनगर- शिर्डीकरांनी पाथरी जन्मस्थळाच्या वादावरून उद्यापासून बेमुदत बंद पुकारला आहे. बंदच्या काळात शिर्डीचे साईबाबा मंदिर भक्तांच्या दर्शनासाठी खुले राहणार आहे. त्याचबरोबर, मंदिरातील दैनंदीन कार्यक्रमात कोणतेही बदल केले जाणार नाहीत. सोबतच, साई संस्थान प्रसादालय, भक्ती निवास आणि रुग्णालयेही खुली राहणार असल्याची माहिती, साईबाबा संस्थानचे मुख्यकार्यकारी अधिकारी दिपक मुगळीकर यांनी दिली आहे.
साईबाबांच्या जन्मस्थळाचा वाद वारंवार उपस्थित केला जात असल्यामुळे शिर्डीतील ग्रामस्थ संतप्त झाले आहे. या प्रवृत्तीच्या विरोधात आणि साईंची सर्वधर्म समभावाची शिकवण पुसली जावू नये म्हणून शिर्डीकर उद्यापासून शिर्डीत बेमुदत बंद ठेवणार आहेत. या काळात साई मंदिरही बंद राहणार असल्याची चुकीची माहिती पसरवली जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे, साई संस्थान प्रशासनाने आज पत्रकार परिषदेत या बाबत खुलासा करत उद्या आणि त्यानंतरही साई मंदिरातील कोणत्याही कार्यक्रमात बदल होणार नसल्याचे सांगितले.
साईंच्या मंदिरातील नित्यनियमाचे कार्यक्रम तसेच सुरू राहतील. सोबतच, साईसंस्थानच्या वतीने चालविले जाणारे भक्त निवास आणि प्रसादालयही सुरू राहणार आहेत. त्यामुळे, शिर्डीत साईंचे दर्शन बंद राहण्याबाबत पसरत असलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे साई संस्थानच्या वतीने सांगण्यात आले आहे.
हेही वाचा- साई जन्मस्थळाच्या वादातून शिर्डीसह 25 गावांत रविवारपासून बेमूदत बंद!