अहमदनगर - कोपर्डीच्या निर्भयाला न्याय म्हणून आरोपींना फाशीची शिक्षा आणि मराठा समाजाला आरक्षण या दोन प्रमुख मागण्यांसाठी राज्यभर शांततेच्या मार्गाने 52 मोर्चे काढले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ते नाकारले. हा निर्णय खुप दुर्दैवी आणि दुःखद आहे. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी कोपर्डी घटनेतील निर्भयाच्या आईने केली आहे. आरक्षण न मिळाल्यास समाज पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
फडणवीसांनी जसा न्याय दिला तसा तुम्हीही द्या -
मराठा समाजाला सामाजिक आणि आर्थिक मुद्यावर आरक्षण मिळावे ही फार जुनी मागणी आहे. विविध स्तरावर ही मागणी होत होती. मात्र, जुलै 2016 मध्ये नगरच्या कर्जत तालुक्यातील कोपर्डी गावात निर्भयावर झालेल्या क्रूर अत्याचार आणि निर्घृण हत्येनंतर अवघा मराठा समाज पेटून उठला. निर्भयाला न्याय मिळावा, अपराध्यांना फाशीची शिक्षा व्हावी, यामागण्यांसाठी समाज एकवटला. यातून मराठा क्रांती मोर्चाचा उदय झाला आणि अवघ्या महाराष्ट्रात एकूण 52 मोठे मूक क्रांती मोर्चे निघाले. या मोर्चांची तत्कालीन फडणवीस सरकारला गांभीर्याने नोंद घ्यावी लागली. मुंबईत काढण्यात आलेल्या मोर्च्यात कोपर्डीच्या निर्भयाचे आईवडील सहभागी झाले. त्यामुळे आज सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आरक्षणाच्या विरोधात गेल्याने निर्भयाच्या आईने दुःख व्यक्त केले आहे. आता मुख्यमंत्री ठाकरे यांनी मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
काय आहे निर्भया प्रकरण ?
कोपर्डी गावातील एक शाळकरी मुलगी सकाळी सायकल घेऊन गावातच असणाऱ्या आपल्या आजोबांच्या घरी काही सामान आणण्यासाठी गेली होती. तिकडून परतत असताना आरोपी जितेंद्र उर्फ पप्पू बाबुलाल शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे यांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केली. खूप वेळ मुलगी घरी आली नाही म्हणून कुटुंबीयांनी शोधाशोध केल्यानंतर तिचा मृतदेह आढळला होता.