अहमदनगर: राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर खालच्या पातळीचे शब्द वापरून टीका करणारे शिंदे सरकार मधील कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात आज मंगळवारी पारनेरमध्ये पारनेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जोरदार निदर्शन करत सत्तारां बाबत निषेध नोंदवत आमदार निलेश लंके यांनी आता माफी नकोय, अशा नालायक मंत्र्याला पदावरून काढा अशी तीव्र शब्दात मागणी केली आहे.
चपलांचा हार घालून पुतळा दहन पारनेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहरातील खालची वेस या ठिकाणी महात्मा फुले यांच्या पुतळ्या समोर अब्दुल सत्तारांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले आहे. यावेळी आमदार निलेश लंके यांनी पक्षाच्या भावना तीव्र शब्दात मांडल्या आहेत. सत्तार यांच्या पुतळ्याला चपलांचा हार घालून महिला- पुरुष कार्यकर्त्यांनी पुतळ्याला चपला मारले आहे. यात महिला कार्यकर्त्या आघाडीवर होते. यावेळी पन्नास खोके माजलेले बोके अशा आशयाचे पोस्टर कार्यकर्त्यांच्या हातात होते आणि त्यावर कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचे छायाचित्र होते. जोरदार घोषणाबाजी करत प्रतिकात्मक पुतळ्याचे यावेळी दहन करण्यात आले आहे.
पुरोगामी महाराष्ट्रात हे चालणार नाही अब्दुल सत्तार हे शेतकऱ्यांशी निगडित आशा महत्वाच्या कृषिमंत्री पदावर आहेत. या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले आंबेडकर यांचा मोठा वारसा आहे. हा वारसा जेष्ठनेते शरद पवार चालवत असून महिलांना पन्नास टक्के आरक्षण त्यांनी पक्षात दिले आहे. तर खासदार सुप्रिया सुळे या संसदेत राज्य आणि देशातील महिलांचे प्रश्न हिरीरीने मांडत हा वारसा जपत आहेत. संसद रत्न पुरस्कार असलेल्या सुप्रिया सुळें बाबत जबाबदार मंत्र्याने अशी शिवीगाळ करत वक्तव्य हे मोठे निषेधार्ह आहे. हा केवळ त्यांचा नव्हे, तर सर्व महिलांचा अपमान असल्याने सत्तार यांची आता माफी नकोय तर अशा नालायक मंत्र्याला शिंदे- फडणवीस यांनी पदावरून हटवावे, ही आमची मागणी असल्याचे आमदार निलेश लंके यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
गाड्या फोडणे आम्हाला नवीन नाही सरकारने त्यांचा राजीनामा घेतला नाही, तर अब्दुल सत्तार यांना आम्ही नगर जिल्ह्यात फिरू देणार नाही, असा इशारा पुन्हा आमदार निलेश लंके यांनी दिला आहे. गाड्या फोडणे हा आम्हाला नवीन धंदा नाही, आमच्यासाठी हे जुनेच आहे. अशा शेलक्या आणि आक्रमक शब्दात आमदार निलेश लंके यांनी अब्दुल सत्तार यांना यावेळी इशारा दिला आहे.