अहमदनगर- राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला काही तास बाकी राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यभरातील अनेक ठिकाणी उत्साही कार्यकर्त्यांनी आपल्या आवडत्या नेत्याच्या विजयाच्या जल्लोषाची तयारी सुरू केली आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघात रोहित पवार विजयी झाल्याचे फलक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना लावले आहेत.
कर्जत-जामखेड मतदारसंघाच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे. ही निवडणूक राष्ट्रवादी आणि भाजपने प्रतिष्ठेची केली आहे. कर्जतमध्ये एका उंच इमारतीवर रोहित पवार यांच्या विजयाचा लागलेला फलक हा मतदारसंघात चर्चेचा विषय झाला आहे. रोहित पवार हे प्रचंड बहुमताने निवडून आल्याचे कार्यकर्त्यांनी फलक लावले आहेत. तसेच मिरवणुकीसाठी डॉल्बी सिस्टीमची कार्यकर्त्यांनी नोंदणी केल्याचे बोलले जात आहे.
कर्जत-जामखेड मतदारसंघात चुरशीची लढत-
कर्जत-जामखेड मतदारसंघात भाजपचे मंत्री राम शिंदे आणि राष्ट्रवादीचे रोहित पवार यांच्यात चुरशीची लढत आहे. जामखेड शहरात विक्रमी मतदान झाल्याने दोन्ही उमेदवारांची धाकधूक वाढल्याचे बोलले जात आहे. उद्या निकालानंतर जामखेडची जनता कुणाच्या गळ्यात विजयाची माळ टाकते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.