अहमदनगर- ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आल्याने खान्देशात पक्षाला बळ मिळेल. भाजपमध्ये खडसे यांनी एवढा अन्याय सहन कसा केला? याचे आश्चर्य वाटते. आता ते राष्ट्रवादीत येत आहेत पक्षात त्यांचा सन्मान होईल, अशी ग्वाही पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. गुरुवारी मुश्रीफ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. त्यानंतर मुश्रीफ पत्रकारांशी बोलत होते.
मागील 11 महिन्यांपासून भाजपकडून राज्य सरकार पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे; पण ते शक्य नाही, असे सांगून मुश्रीफ म्हणाले, की विधानसभेतील विरोधी पक्षनेत्यांनी शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाईची मागणी केली आहे. मात्र, पाच वर्षे सत्तेत असताना, त्यांनी एकदाही सरसकट भरपाई दिली नाही. कोल्हापूर जिल्ह्यात पूर आला असताना, हे "जनाधार' शोधत होते. त्यामुळेच कोल्हापूरच्या बाराही मतदारसंघात भाजपचा पराभव झाला. प्रदेशाध्यक्षांना कोल्हापूर सोडून पुण्यात जावे लागले. भाजप नेते सत्तेत वेगळी कृती करतात व सत्ता गेल्यावर वेगळे बोलतात, असा टोलाही त्यांनी चंद्रकांत पाटील आणि भाजपला लगावला आहे'
राष्ट्रवादीत'मेरिट'वर प्रवेश दिला जाईल-
पिचड यांनीही पक्ष सोडताना अन्याय झाल्याची भावना व्यक्त केल्याबाबत विचारले असता, मुश्रीफ म्हणाले, "माजी मंत्री मधुकर पिचड यांना पक्षाने काय कमी दिले? त्यांना पक्षाने भरभरून दिले होते. आता राष्ट्रवादीत येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. खडसे हे तर "अभी झॉंकी' आहेत. मात्र, मेरीटवर बाकीच्यांना पक्षात घेऊ. अनेकांना पुन्हा पक्षात यायचे आहे. मात्र, लोकांना तपासूनच पक्षात घेऊ''
त्यावेळी 'ते' जनादेश यात्रेत मी पुन्हा येईन मध्ये व्यस्त होते-
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या सरसकट नुकसानभरपाईची मागणी करत आहेत. मात्र पंचनामे केल्याशिवाय नुकसानीचा अंदाज येत नाही आणि त्या शिवाय राज्यच काय केंद्र सुद्धा मदत देऊ शकत नाही. फडणवीस यांना हे सर्व माहीत आहे. त्यांच्या पाच वर्षांच्या काळात त्यांनी एकदाही सरसकट मदत केलेली नाही. एव्हढेच नव्हे तर मागील वर्षी कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर ते सहा दिवस कोल्हापूरकडे फिरकले पण नाहीत. त्यावेळी ते जनादेश यात्रेत मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईनचा नारा देत होते. त्यामुळेच कोल्हापूरच्या जनतेने विधानसभेत एकही जागा भाजपला जिंकून दिली नाही. तर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना पुण्याला निवडणूक लढवायला जावे लागले. त्यामुळे फडणवीस यांची मागणी केवळ राजकीय आहे, मात्र महाविकास आघाडी सरकार लवकरात लवकर पंचनामे उरकून शेतकऱ्यांची दिवाळी गोड करेल, असा विश्वास मुश्रीफ यांनी व्यक्त केला.