अहमदनगर - राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कर्जत-जामखेड विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघासाठी पक्ष निरिक्षंकाकडे उमेदवारी मागितली आहे. रोहित यांच्यासह एकूण तीन उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहेत. यामुळे आता पक्षाकडून कोणाला टिकीट दिले जाईल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
उमेदवारी मागितली आहे आता पक्ष जो आदेश देईल तो पाळू
रोहित पवार यांनी मी कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी मागितली आहे. यानंतर बोलताना त्यांनी, ही लोकशाही पद्धत असून पक्ष सर्व कार्यकर्त्यांना समान संधी असल्याचे समाधान आहे. आता पक्ष जो आदेश देईल तो आम्ही पाळू. एकसंघपणे लढत दिल्यास निश्चित हा मतदारसंघ जिंकु शकतो, असा विश्वास व्यक्त केला आहे.
पिचड भाजपत जाणार नाहीत - वळसे-पाटील
दिलीप वळसे पाटील, अंकुश काकडे आदी निरीक्षकांनी यावेळी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. यावेळी ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड आणि त्यांचे आमदार पुत्र वैभव पिचड हे अनुपस्थित होते. त्यामुळे वैभव पिचड हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र पक्षाचे प्रभारी दिलीप वळसे पाटील यांनी, वैभव पिचड भाजपात जाणार नाहीत. कुठलाही सदस्य मुख्यमंत्र्यांना आपल्या कामानिमित्त भेटत असतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना भेटल्यावर भाजप किंवा त्यांच्या पक्षात प्रवेश करेल, असा अर्थ काढणे चुकीचे असल्याचे मत वळसे-पाटील यांनी व्यक्त केले आहे.
लंकेंमुळे सुजित झावरे नाराज
पारनेर विधानसभा मतदारसंघासाठी शिवसेनेतून आलेले निलेश लंके यांनी मुलाखत दिली. लंके यांची उमेदवारी ही अंतिम समजली जाते, मात्र यामुळे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे हे प्रचंड नाराज असून निष्ठावंतांना डावलले तर वेगळा विचार करावा लागेल असा इशारा त्यांनी दिला आहे.