अहमदनगर - पारनेर मतदारसंघात बिनविरोध ग्रामपंचायत निवडणूक करा, आणि आमदार निधीतील पंचवीस लाख मिळवा, अशी घोषणा राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी केली होती. यांच्या घोषणेला साद घालत नवनागापूर गावातील तीन गटांनी ग्रामपंचाय निवडणूक बिनविरोध म्हणून घोषित केली होती. पण याला गावातील काही नागरिकांनी विरोध करत गावात लोकशाही मार्गाने निवडणूक होणारच, असे जाहीर करत आमदार लंकेच्या घोषणेला विरोध दर्शवला आहे.
लोकशाहीसाठी निवडणुका हव्यात-
नगर शहराजवळ औद्योगिक वसाहतीमुळे नव्याने लोकसंख्या वाढल्याने नवनागापूर या ग्रामपंचायतीची काही वर्षांपूर्वी स्थापना करण्यात आली. या ग्रामपंचायत हद्दीत स्थानिकांसोबतच परप्रांतीय नागरिकही मोठ्या संख्येने रहिवासी आहेत. त्यातच आता ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार निलेश लंके यांनी निवडणुका बिनविरोध करणाऱ्या ग्रामपंचायतीला २५ लाखाचा निधी देण्याची घोषणा केली होती. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद म्हणून नवनागापूर ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचे गावातील तीन गटांनी एकत्र येत ठरवले होते. तसे पत्र राष्ट्रवादी भवनात स्थानिक तिन्ही गटाने आमदार लंकेना दिले, मात्र आता काही स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी एक बैठक घेत बिनविरोधचा निर्णय एकतर्फी घेतल्याचा आरोप केला आहे. गावातील सर्वांना विश्वासात न घेता आणि ग्रामसभा न घेता हा निर्णय घेतल्याने बिनविरोध निवडणुकीचा निर्णय मान्य नसल्याचे सांगत गावात निवडणूक लोकशाही मार्गाने होणार, असे घोषित केले आहे.
आमदार लंकेच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून पारनेर विधानसभा मतदारसंघात तीस'च्या वर गावांनी ग्रामपंचायत बिनविरोधचा निर्णय घेतला आहे, अनेक ठिकाणी ग्रामसभा घेत असे ठराव करण्यात आले आहेत. आमदार लंके यांनी जिल्हा परिषद गट निहाय बैठका घेत त्या-त्या गावातील सर्व गटांना एकत्र करत बिनविरोध निवडणुकांचे आवाहन केले. अनेक ठिकाणी त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे ,असे असले तरी पारनेर तालुक्यातील माजी आमदार विजय औटी, माजी जिल्हापरिषद उपाध्यक्ष सुजित झावरे यांच्या कडून कसा प्रतिसाद मिळणार हा विषय चर्चेत आहे.
लोकशाहीच्या संवैधानिक मार्गाने निवडणुका म्हणजे जीवंत लोकशाहीचे प्रतीक म्हणून निवडणुका का नको? असाही एक सूर आता पुढे येऊ लागला आहे, या पार्श्वभूमीवर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुका किती धुमधडाक्यात पार पडणार की शांततेत उरकल्या जाणार हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.