अहमदनगर - नगर जिल्ह्यासह राज्यात आणि परराज्यात शाखा असलेल्या 'नगर अर्बन बँके'च्या शेवगाव शाखेतील तारण ठेवलेल्या सोन्यामध्ये बेन्टेक्सचे दागिने आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. नगर येथील मुख्य शाखेत बुधवारी लिलाव प्रक्रिया सुरू असताना हा प्रकार उघडकीस आला. यामुळे लिलाव प्रक्रियेत सहभागी झालेले सराफ निघून गेले. बँकेच्या शेवगाव येथील शाखेतील सोने तारण ठेवलेल्या ३६४ पिशव्यांमध्ये सोन्याऐवजी बेंटेक्सचे दागिने निघू लागल्याने गोंधळ निर्माण झाला आणि लिलाव प्रक्रिया थांबवण्यात आली, तर लिलावासाठी उपस्थित असलेले सराफा व्यापारी निघून गेले.
भाजपचे दिलीप गांधी बँकेचे अध्यक्ष असताना गैरप्रकार झाल्याचा आरोप
तत्कालीन संचालक मंडळाने मर्जीतल्या सभासदांच्या नावे बनावट सोने तारण ठेवून कोट्यवधी रुपयांचे कर्ज वितरित केले असल्याच्या शंकेला बुधवारी पुष्टी मिळाली. बुधवारी झालेल्या लिलाव प्रक्रियेने सर्व तारण ठेवलेले सोने तपासल्यानंतर एकूण घोटाळ्याची रक्कम पुढे येऊन नव्याने गुन्हा दाखल केला जाणार आहे. या पूर्वीच गैरमार्गाने कर्जवितरण, अनावश्यक खर्च आदी कारणामुळे नगर आणि पुणे पोलिसांत गुन्हे दाखल असून, काही तत्कालीन संचालकांना अटकही झालेली आहे. भाजपचे माजी केंद्रीयमंत्री स्वर्गीय दिलीप गांधी हे बँकेचे अध्यक्ष असताना हा गैरप्रकार झाल्याचा आरोप नगर अर्बन बँक बचाव कृती समितीचा आहे. सध्या बँकेवर दोन वर्षांपासून प्रशासक नेमण्यात आले आहे.
प्रशासकांनी समाधानकारक उत्तरे न दिल्याने गोंधळ
दरम्यान लिलावाच्या ठिकाणी अर्बन बँकेतील कर्ज वितरणातील अनियमितता, वसुली ऑडिट रिपोर्ट आदी संदर्भात बँकेच्या सभासदांनी प्रशासक महेंद्रकुमार रेखी यांना जाब विचारला असता, सभासदांच्या प्रश्नांची उत्तरे रेखी यांना देता आले नाही. यामुळे बँकेमध्ये गोंधळ निर्माण झाला. प्रशासकांनी उत्तर न दिल्याने सभासद चांगलेच आक्रमक झाले होते.
शेवगाव शाखेबद्दल अनेक तक्रारी
नगर अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेत तारण ठेवलेल्या सोन्याची बुधवारी बँकेच्या नगर येथील मुख्य शाखेत लिलाव प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती. लिलावासाठी 364 पिशव्या आणण्यात आल्या होत्या. तारण ठेवलेल्या या सोन्यावर बँकेने कोट्यवधी रुपयांचे कर्ज वितरित केले आहे. प्रत्यक्षात मात्र बनावट सोन्याच्या माध्यमातून कर्ज वितरित झाल्याचे समोर आले आहे. यावेळी पाच पिशव्यांमध्ये सोन्याऐवजी बेन्टेक्सचे दागिने निघाल्याने लिलाव प्रक्रियेत सहभागी झालेले सराफ निघून गेले. शेवगाव शाखेत बनावट सोने गहाण ठेवून कर्ज वितरण होत असल्याची माहिती खुद्द तेथील शाखा प्रमुखांनी 2018 साली मुख्य कार्यालयाला कळवली होती, मात्र त्याची दखल न घेता कोट्यवधी रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले. याबाबत नगर अर्बन बँक बचाव कृती समितीचे राजेंद्र गांधी, यांनी आवाज उठवला होता. राजेंद्र गांधी हे बँकेत होत असलेल्या गैरप्रकारांबाबत गेली अनेक वर्षे लढत आहेत. उपोषण, आंदोलन, पोलिसांत तसेच न्यायालयात त्यांनी याबाबत चौकशीसाठी सतत पाठपुरावा केलेला आहे. शेवगाव शाखेत गैरमार्गाने झालेल्या कर्ज वितरणाबाबतही त्यांनी 2018 सालपासून पाठपुरावा केला आहे.
सोने तपासणीअंती गुन्हा दाखल होणार
लिलाव बाकी असलेले उर्वरित कोट्यावधी रुपयांचे सोनेही बनावट असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे नगर अर्बन बँकेत कोट्यावधी रुपयांचे सोनेतारण अपहार समोर आला आहेत. दरम्यान तारण असलेल्या सर्व सोन्याचा पंचनामा करून पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे बँकेतील अधिकार्यांनी सांगितले.
तोटा कमी करण्यासाठी कर्मचाऱ्यांची पगार कपात!!
या प्रकाराची माहिती मिळताच बँकेतील गैरव्यवहारांसंबंधी सातत्याने पाठपुरावा करणारे बँकेचे माजी संचालक आणि बँक बचाव कृती समितीचे राजेंद्र गांधी, अनिल गट्टाणी, भैरवनाथ वाकळे, पोपट लोढा तेथे दाखल झाले. त्यांनी यासंबंधी प्रशासकाला जाब विचारला. मात्र, प्रशासक महेंद्रकुमार रेखी हे समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत. यावेळी समितीच्या सदस्यांनी प्रशासकाला चांगलेच धारेवर धरले. यावेळी प्रशासक रेखी यांनी बँकेचा तोटा कमी करण्यासाठी कर्मचाऱ्यांची पगार कपात करण्यात येणार असल्याचे गांधी यांनी सांगितले. अनेक मोठे थकबाकीदार असून त्यांच्याकडे कोट्यवधींची थकबाकी असताना ती वसूल न करता, प्रशासन निष्पाप कर्मचाऱ्यांची पगार कपात करत असल्याने समितीच्या सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. बँकेत झालेल्या एकूण घोटाळ्यांची माहिती जाहीर करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यासाठी बँक बचाव कृती समितीने 28 जून पर्यंतची मुदत रेखी यांना दिली असून, तोपर्यंत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन सभासद छेडतील असा इशारा देण्यात आला आहे.
हेही वाचा - सोने खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्याला 75 लाखाचा गंडा, तीन संशयितांना घेतले ताब्यात